मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१९ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – माहीम परिसरात असलेल्या दैनिकाच्या कार्यालयात चोरी करुन पळून गेलेल्या मुख्य आरोपीस चोरीच्या मुद्देमालासह माहीम पोलिसांनी अटक केली. प्रदीप रामचंद्र माने असे या २७ वर्षीय आरोपीचे नाव असून तो मालाडचा रहिवाशी आहे. कचरा वेचण्यासाठी माहीम परिसरात आल्यानंतर त्याने आपलं महानगरच्या कार्यालयात चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने सोमवार २६ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. तपासात प्रदीप रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच काही गुन्हे दाखल आहे.
माहीम येथील एल. जे. रोड, सिटीलाईट सिनेमागृहाजवळील पांडुरंग इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आपलं महानगर दैनिकाचे एक कार्यालय आहे. १२ ऑक्टोंबरला या कार्यालयात चोरी झाली होती. अज्ञात व्यक्तीने मुख्य लाकडी दरवाज्याचे लॉक तोडून आत प्रवेश केला होता. सर्व अस्ताव्यस्त करुन कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेज बंद केले होते. त्यानंतर लॉकरसह ड्राव्हरमधील सहा लाख नऊ हजाराची कॅश तसेच डिजीटल लॉकर चोरी करुन पलायन केले होते. ही माहिती समजताच माहीम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी माहीम पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. या चोरीच्या घटनेची पोलीस उपायुक्त महेंद्र पंडित, सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र आडाणे यांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पवार यांना तपासासह आरोपींच्या अटकेचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनिल केंगार, मंदार भारती, पोलीस शिपाई आनंद पाटील, सागर देसले, श्रीकांत पालवे, गणेश पाटील, पोलीस हवालदार विनोद पवार आदी पथकाने तपास सुरु केला होता. चोरी करताना आरोपीने तोंडाला मास्क लावले होते, त्यामुळे त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले होते. कार्यालयासह परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली होती, या चौकशीदरम्यान या गुन्ह्यांतील काही आरोपी माहीम परिसरात पुन्हा चोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस उपनिरीक्षक सुनिल केंगार, मंदार भारती, पोलीस शिपाई आनंद पाटील, सागर देसले, श्रीकांत पालवे, गणेश पाटील, पोलीस हवालदार विनोद पवार यांनी रविवारी रात्री उशिरा माहीम येथील वांद्रे रिक्लेमेशनजवळील माहीम स्लोप परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून प्रदीप माने याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना घरफोडीसाठी लागणारे साहित्यासह काही कॅश सापडली. २ लाख ३६ हजार ३४० रुपयांची कॅश, बॅग, लोखंडी कटावणी, एक स्टिलची मूठ, इलेर्क्टीक बॅटरी आदी मुद्देमाल ताब्यात घेऊन त्याला पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.
चौकशीत प्रदीप हा मालाडच्या बांगुरनगर, हनुमान मंदिरासमोरील चिंचोली बसस्टॉप फुटपाथवर राहत असून तो कचरा वेचण्याचे काम करतो. चौकशीदरम्यान त्यानेच आपलं महानगर कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली. सीसीटिव्ही फुटेजमध्ये मास्क लावलेला व्यक्ती प्रदीप मानेच असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर सोमवारी दुपारी त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्याकडून उर्वरित चोरीचा मुद्देमाल हस्तगत करणे बाकी असून या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. प्रदीपने कचरा वेचताना या कार्यालयाची रेकी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.