ब्लॅकमेल करुन खंडणीची मागणी करणार्या महिलेस अटक
दोन वर्षांत चार कोटीची खंडणीची रक्कम वसुल केल्याचे तपासात उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – अश्लील व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल करुन खंडणीची मागणी करणार्या एका महिलेस गुन्हे शाखेच्या घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी अटक केली. नाझनीन मेहमूद शेख ऊर्फ नाझिया असे या आरोपी महिलेचे नाव असून खंडणीच्या याच गुन्ह्यांत तिला किल्ला कोर्टाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नाझजीनने गेल्या दोन वर्षांत तक्रारदार वयोवृद्धांना ब्लॅकमेल करुन हातपाय तोडण्याची धमकी देऊन चार कोटीची खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. खंडणीचा हप्ता घेताना तिच्यावर गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी कारवाई केली. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असून तिने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
६१ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार घाटकोपर येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत असून कुर्ला येथील एका ज्वेलर्स शॉपमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या शॉपमध्ये सायरा ऊर्फ शगुफ्ता नावाची एक महिला तिच्या आईसह बहिणीसोबत नियमित येत होती. तिने शॉपमधून काही सोन्याचे दागिने घेतले होते. त्यातून त्यांची तिच्याशी चांगली ओळख झाली होती. या ओळखीनंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर केले होते. त्यानंतर ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. तिने तिचा घटस्फोट झाला असून तिच्या एकुलत्या मुलाचेही निधन झाल्याचे सांगितले होते. अनेकदा ती त्यांच्याकडे पैशांची मागणी करत होती. त्यामुळे त्यांनी तिला मार्च ते डिसेंबर २०२४ या कालावधीत दहा लाख रुपये दिले होते. याच दरम्यान तिने त्यांना व्हिडीओ कॉल केला होता. त्यांनी तो कॉल घेतल्यानंतर नाझियाने कपडे घातले नव्हते. ती पूर्णपणे नग्नावस्थेत होते.
याबाबत त्यांनी तिला विचारणा केली असता तिने त्यांना उत्तर देण्याचे टाळले. तशाच अवस्थेत त्यांच्याशी संभाषण सुरु ठेवले होते. काही वेळानंतर त्यांनी तो कॉल कट केला. दुसर्या दिवशी त्यांनी तिला कॉल करुन अशाच प्रकारे पुन्हा व्हिडीओ कॉल करु नकोस असे सांगितले होते. यावेळी तिने त्यांची माफी मागून पुन्हा व्हिडीओ कॉल करणार नाही असे सांगितले. एक महिन्यानंतर तिने त्यांच्यातील व्हिडीओ कॉलची एक क्लिप पाठवली होती. ती क्लिप चेन्नई पोलिसांच्या हाती सापडली असून ती क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल होऊ नये म्हणून पाच लाखांची मागणी करत आहे असे सांगितले. या प्रकाराने ते प्रचंड घाबरले. ती क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यास त्यांच्या मित्रांमध्ये, नातेवाईकासह कुटुंबियांमध्ये त्यांची प्रचंड बदनामी होऊ शकत होती. त्यामुळे त्यांनी तिला सहा लाख रुपये दिले होते. तिने ती चेन्नईला जात असून पोलिसांना पैसे देणार असल्याचे सांगितले.
तक्रारदार त्यांच्या प्रतिष्ठेला, कुटुंबातील भितीमुळे तिच्या जाळ्यात चांगलेच अडकले आहे हे तिला समजले होते. त्यामुळे ती त्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडे सतत पैशांची मागणी करत होती. बदनामीच्या भीतीने ते तिला सोने विक्री करुन पैसे देत होते. डिसेंबर २०२४ ते ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत त्यांनी तिला ऑनलाईन तसेच कॅश स्वरुपात चार कोटी रुपये दिले होते. १० ऑगस्ट २०२६ रोजी ती त्यांना कुर्ला येथे भेटली होती. यावेळी तिने त्यांच्याकडे आणखीन सहा लाखांची मागणी केली. मात्र त्यांनी तिला पैसे देण्यास नकार दिला. यावेळी तिने त्यांना पैसे दिले नाहीतर त्यांचे हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली होती.
ती त्यांना सतत ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी करत होती. सोशल मिडीयावर त्यांच्यातील अश्लील क्लिप डिलीट करण्यासाठी न्यायाधिश, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच इतरांना पैसे द्यावेच लागतील. नाहीतर त्यांचीच बदनामी होईल असे सांगून त्यांच्या मनात भीती निर्माण करत होती. तिच्या धम्क्यांना कंटाळून त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेच्या युनिट सातला तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप सरफरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनाजी साठे, महेश शेलार, पोलीस उपनिरीक्षक अजय गोल्हार, नामदेव परबळकर, पोलीस हवालदार गलांडे, जाधव, राऊत, होनमाने, पाटील, पोलीस शिपाई सावदेकर, गोरडे, महिला पोलीस शिपाई शिंदे, मयेकर, सहाय्यक फौजदार चालक बाळासाहेब कवडे यांनी तपास सुरु केला होता. पोलिसांच्या सांगण्यावरुन त्यांनी तिला घाटकोपर येथील एलबीएस मार्ग, आर के रेस्ट्रॉरंटजवळ बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे ती तिथे आली होती.
यावेळी तक्रारदाराकडून पाच लाखांची खंडणीची रक्कम घेताना तिला पोलिसांनी अटक केली. चौकशीत तिचे नाव नाझनीन ऊर्फ नाझिया शेख असल्याचे उघडकीस आले. ती व्ही. पी रोड, पाचवी इस्लामपुरा, देवीदास इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक चौदामध्ये राहते. तक्रारदार वयोवृद्ध असल्याने तसेच ते त्यांची समाजात प्रचंड प्रतिष्ठा होती, त्याला धक्का पोहचू नये म्हणून ते तिला पैसे देतील असे तिला वाटत होते, त्यामुळे ती त्यांना सतत ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी करत होती. पैसे दिले नाहीतर त्यांचे हातपाय तोडण्याची धमकी देत होती. अटकेनंतर तिला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला शुक्रवार २३ ऑक्टोंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.