अठरा महिन्यांच्या मुलीला सहाव्या मजल्यावरुन फेंकून दिल्याचे उघड
दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीविरुद्ध अखेर हत्येचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२६
मुंबई, दि. – गोरेगाव येथील म्हाडा वसाहतीत आरिबा शाकीर खान या अठरा महिन्यांच्या मुलीचा मृतदेह सापडल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. मात्र ही मुलगी सहाव्या मजल्यावरुन पडली नसून तिला तिच्याच शेजारी राहणार्या एका दहा वर्षांच्या मुलीने सहाव्या मजल्यावरुन खाली फेंकून दिल्याचे सीसीटिव्ही फुटेजमध्ये उघडकीस आले आहे. या फुटेजसह मृत मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरुन दहा वर्षांच्या मुलीविरुद्ध पाच दिवसांनी दिडोंशी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याने तिला तिच्या पालकांकडेच सोपविण्यात आले आहे. या घटनेमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही.
आबिदा शाकीर खान ही महिला घरकाम करत असून ती तिच्या पती सासू-सासरे आणि मुलांसोबत गोरेगाव येथील शिवशाही, अंजुमन सोसायटीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ६०२ मध्ये राहते. आरिबा ही तिची अठरा वर्षांची मुलगी आहे. १४ ऑक्टोंबरला रात्री नऊ ते साडेनऊ वाजता आरिबा ही तिच्याच रुमसमोरील लॉबीमध्ये एका मांजरीसोबत खेळत होती. काही वेळाने ती तिथे नसल्याचे अबिदाला दिसून आले. त्यामुळे तिने आरिबाचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. याच दरम्यान तिचा मुलाने लॉबीच्या खाली डोकावून पाहिले असता त्याला आरिबा ही बेसमेंटमध्ये बेशुद्धावस्थेत पडल्याचे दिसून आली. त्यामुळे तिला घेऊन खान कुटुंबिय जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
आरिबा ही सहाव्या मजल्यावरुन खाली पडली होती. मात्र त्यांच्या इमारतीच्या पायर्याच्या बाहेरील बाजूस असलेली संरक्षण भिंत साडेतीन फुट उंचीची होती. आरिबाची उंची तेवढी नसल्याने आबिदाला संशय निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच दिडोंशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आबिदाने तिचा संशय व्यक्त करुन पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती केली होती. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत एडीआरची नोंद करुन तपासाला सुरुवात केली होती.
सहाव्या मजल्यावरील लॉबीमध्ये असलेले सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या फुटेजमध्ये तिथे एक दहा वर्षांची मुलगी आरिबाला हातावारे करुन लिफ्टच्या दिशेने बोलवते. आरिबा हीदेखील तिच्या मागे जाताना दिसते. त्यानंतर ती मुलगी आरिबाला जिवे मारण्याच्या उद्देशाने दोन्ही हातामध्ये धरुन तिला लिफ्टच्या बाजूला असलेल्या डक्ट एरियामध्ये खाली फेकून देत असल्याचे दिसून आले. या घटनेनंतर ती तिच्या घराच्या दिशेने पळून गेली होती.
या फुटेजनंतर घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे आबिदा खान हिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चार दिवसांनी आरोपी दहा वर्षांच्या मुलीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगिलते. सीसीटिव्ही फुटेजमध्ये हत्येचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती.