राजस्थानातून आणलेल्या हेरॉईनसह मुख्य आरोपीसह तिघांना अटक

तिघांकडून दहा कोटी सोळा लाखांचे २०३२ ग्रॅम हेरॉईन जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – राजस्थानातून आणलेल्या हेरॉईन तस्करीप्रकरणी एका टोळीचा कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एका मुख्य आरोपीसह तिघांना पोलिसांनी अटक केली. समीर सलीम कुरेशी, साकिब साजिद गौर ऊर्फ बटल्या आणि राजकुमार श्यामलाल मीना अशी या तिघांची नावे आहेत. ते तिघेही उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि राजस्थानचे रहिवाशी आहे. अटकेनंतर राजकुमारला किल्ला कोर्टाने पोलीस तर इतर दोघांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी होत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बोरिवली परिसरात काहीजण ड्रग्जची डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.

१४ ऑक्टोंबरला तिथे समीर कुरेशी आणि साकिब गौर आले होते. या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना ७५८ गॅ्रम वजनाचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत ३ कोटी ७९ लाख रुपये इतकी होती. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. पोलीस कोठडीत असताना त्यांनी ते हेरॉईन राजस्थान येथून आणल्याची कबुली दिली.

चौकशीत राजकुमार मीना याचे नाव समोर आले होते. त्यानंतर या पथकाने राजकुमारला १७ ऑक्टोंबरला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी १२७४ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले सऊन त्याची किंमत ६ कोटी ३७ लाख रुपये इतकी आहे. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी २०३२ ग्रॅम वजनाचा हेरॉईनचा साठा जप्त केला असून त्याची किंमत दहा कोटी सोळा लाख रुपये आहे. यातील समीर उत्तरप्रदेश, साकिब उत्तराखंड आणि राजकुमार राजस्थानचा रहिवाशी आहे.

समीर आणि साकिब राजस्थानातील रहिवाशी असलेल्या राजकुमारकडून हेरॉईनसह इतर ड्रग्ज घेत होते. या ड्रग्जची ते दोघेही मुंबईतील ड्रग्ज पेंडलरच्या मदतीने पुड्या बनवून विक्री करत होते. झटपट पैशांसाठी त्यांनी ड्रग्ज विक्री करत असल्याचे सांगितले. राजकुमार हा कटातील मुख्य आरोपी असून तो गेल्या दोन ते तीन वर्षांपासून ड्रग्ज सप्लार करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांनी दुजोरा दिला आहे.

पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश मदने यांच्या मार्गदर्शनासाठी कांदिवली युनिटच्या गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, विश्‍वास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला थोरात, दादासाहेब बनसोडे, अमीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब शिंदे, विशाल तेजाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रसेन गायकवाड, चंद्रकांत गवस, शिरीष सुर्वे, पोलीस हवालदार शिवाजी चेरमले, विक्रांत खांडेकर, हेमंत कांबळे, संतोष निजाई, बळीराम गोवळकर, सचिन खताते, महिला पोलीस हवालदार सोनाली लाढे, एकनाथ बधू जाधव, रंजीता सावंत, लक्ष्मण चव्हाण, महिला पोलीस शिपाई हिरा जाधव, जयश्री गोसावी, नरेश भिकया वरठा, राम मेर्‍या, सचिन वळतकर, पोलीस हवालदार चालक गोविंद सानप, संतोष वारिक आदी पथकाने ही कारवाई केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page