वाहनातून मोबाईल चोरी करणारी आंतरराज्य टकटक टोळी गजागाड
सहा गुन्ह्यांची उकल तर चोरीचे दोन महागडे मोबाईल हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२० ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सिग्नलवर थांबलेल्या वाहनातून मोबाईल चोरी करणार्या एका टकटक टोळीचा वाकोला पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत दोन रेकॉर्डवरील सराईत आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद इम्रान यासीन कुरेशी आणि इस्लाम नुरुद्दीन कुरेशी अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून गुन्ह्यांतील एक लाख ऐंशी हजाराचे दोन्ही महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहे. दोन्ही आरोपी उत्तरप्रदेशच्या मेरठचे रहिवाशी असून चोरीनंतर ते दोघेही मेरठला पळून जात होते. काही दिवस तिथे राहून ते पुन्हा चोरीसाठी मुंबईत येत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ते दोघेही आंतरराज्य टकटक टोळीचे सदस्य असून त्यांच्या अटकेने सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मोहम्मद झैद अब्दुल्ला खान हा कुर्ला येथील मराठी बुद्ध कॉलनीतील रहिवाशी आहे. ४ सप्टेंबरला तो त्याच्या कारमधून जात होता. यावेळी त्यांनी त्याचे दोन्ही मोबाईल बाजूला सीटवर ठेवला होता. सायंकाळी पावणेसात वाजता ही कार सांताक्रुज येथील वाकोला जंक्शन सिग्नलजवळ आली असता एका अज्ञात व्यक्तीने कारच्या काचेवर टकटक करुन त्यांच्याकडे काच खाली करण्यास सांगितले. त्याने काच खाली केली असता विरुद्ध दिशेने दुसर्या अज्ञात व्यक्तीने कारच्या सीटवर ठेवलेला त्यांचा मोबाईल चोरी केले होते. कारच्या काचेवर टकटक करुन मोहम्मद झैद याचे लक्ष विचलित करुन या दोघांनी त्याचे दोन्ही मोबाईल चोरी करुन पलाायन केले होते.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी वाकोला पोलिसांना घडलेला प्रकार सांगून दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपींची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरु केला होता. या फुटेजमध्ये एका आरोपीची ओळख पटली होती. तो अशाच प्रकारे सिग्नल थांबलेल्या वाहनातून मोबाईल चोरी करत असल्याचे उघडकीस आले होते. तपासात ही टोळी सांताक्रुज ते मुंबई सेंट्रल दरम्यान अशा प्रकारचे गुन्हे करत होते. त्यामुळे पोलिसांनी दोनशेहून अधिक सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन मुंबई सेंट्रल येथून मोहम्मद इम्रान आणि इस्लाम या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत या गुन्ह्यांत या दोघांचाही सहभाग उघडकीस आला. त्यानंतर त्यांना मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत अटक करुन वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे दोन्ही मोबाईल जप्त केले असून त्याची किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये इतकी आहे. या दोघांच्या अटकेने सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यात वाकोला आणि सहार पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन तर आझाद मैदान आणि साकिनाका पोलीस ठाण्यातील प्रत्येक एक गुन्ह्यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांतील चोरीचा मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे.
ते दोघेही आंतरराज्य टकटक टोळीचे सदस्य आहेत. चोरीनंतर ते दोघेही त्याच दिवशी मुंबईतून मेरठला पळून जात होते. काही दिवस तिथे राहिल्यानंतर ते पुन्हा चोरीच्या उद्देशाने मुंबईत येत होते. १९ ऑक्टोंबरला ते मुंबईत आले होते. चोरीच्या उद्देशाने ते दोघेही मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच्या दिशेने प्रवास करत होते, ही माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नवनाथ घुगे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुशांतकुमार पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मसने, पोलीस शिपाई गायकवाड, गुरव, भोसले, मुन्ने, ओंकार गायकवाड आदी पथकाने दोन्ही आरोपींना शिताफीने अटक केली. याकामी या पथकाला वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तळेकर, मसुब गायके यांनी विशेष सहकार्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर दोन्ही आरोपींना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.