टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी दोन महिलांसह चौघांना अटक व कोठडी

गोळीबारासाठी शूटरला शस्त्रे पुरविल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सिनेअभिनेता टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी अन्य चार आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यात दोन महिलांचा समावेश असून या चौघांवर गोळीबारासाठी शस्त्रे पुरविल्याचा आरोप आहे. अटक आरोपींमध्ये कुणाल संजय, सुमीत बिर्जेंद्र, राधा सुनिल आणि बबिता रामजनल यांचा समावेश असून अटकेनंतर या चौघांनाही गुरुवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवार २६ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

१८ ऑक्टोंबरला जुहू येथील पुष्पा पार्कजवळ सिनेअभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर बाईकवरुन आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी अंधाधूंद गोळीबार केला होता. या गोळीबारात टायगर सुखरुप बचावला, मात्र त्याच्या चालकासह दोनजण जखमी झाले होते. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांना तिन्ही आरोपींची ओळख पटली होती. गोळीबारानंतर ते तिघेही मुंबईहून सुरतमार्गे राजस्थानात पळून गेले होते. त्यामुळे राजस्थान पोलिसांच्या मदतीने तिन्ही शूटरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई ताजी असताना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्लीतून दोन महिलांसह चौघांना ताब्यात घेतले होते. या चौघांच्या चौकशीत त्यांचा टायगर श्रॉफ गोळीबारात सहभाग उघडकीस आला होता. ही माहिती मुंबई पोलिसांकडून दिल्ली पोलिसांना देण्यात आली होती, त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान या चौघांना अटक केल्याचे समजताच मुंबई पोलिसांचे एक पथक दिल्लीला गेले होते. या चौघांनाही लोकल कोर्टात हजर करुन त्यांची ट्रॉन्झिंट रिमांड घेऊन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर चारही आरोपींना गुरुवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

प्राथमिक तपासात यातील कुणाल हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता. त्याची ओळख हरसाना गावातील एका मित्राद्वारे अनिल पंडितशी झाली होती. अनिलच्या सांगण्यावरुन कुणालने अमृतसर येथून एक पिस्तूल आणि वीस जिवंत काडतुसे घेतली होती. यावेळी सुमीत हादेखील त्याच्यासोबत होता. दोन महिन्यांपूर्वी कुणालची राधाशी ओळख झाली होती. त्याने तिला गुन्ह्यांत सामिल करुन घेतले होते. तिच्याशी संबंध प्रस्थापित केले आणि तिला शस्त्रांसह मुंबईत जाण्यास तयार केले होते. १५ ऑक्टोंबरला कुणाल, राधा आणि बबिता असे तिघेही दिल्लीतून मुंबईसाठी निघाले होते. यावेळी राधाच्या बॅगेत पिस्तूल आणि काडतुसे होते.

प्रवासादरम्यान कुणाल हा अनिल पंडितच्या संपर्कात होता. संभाषण रेकॉर्ड होऊ नये म्हणून या दोघांमध्ये ऍपद्वारे संभाषण सुरु होते. १७ ऑक्टोंबरला ते तिघेही दादर रेल्वे स्थानकात उतरले. तेथून ते एका हॉटेलमध्ये गेले. त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता एक शूटर हॉटेलमध्ये आला होता. यावेळी राधा आणि बबिताने त्याला पिस्तूल आणि जिवंत काडतुसे दिली. १८ ऑक्टोंबरलाच राधा आणि बबिता हे दादर-हरिद्वार एक्सप्रेसमधून दिल्लीला तर कुणाल व सुमीत सोनीपतला पळून गेले होते. मात्र दिल्लीला गेलेल्या राधा आणि बबिता यांना दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केली. त्यांच्या चौकशीनंतर इतर दोघांना सोनीपत येथून पोलिसांनी अटक केली.

कटातील मुख्य आरोपी अनिल पंडित वॉण्टेड आरोपी
टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर अनिल पंडितने या गोळीबाराची जबाबदारी स्विकारली होती. सोशल मिडीयावर मॅसेजसह क्लिप अपलोड करुन त्याने त्याच्याच सांगण्यावरुन हा गोळीबार केल्याची कबुली दिली होती. या संपूर्ण कटाची आखणी, शूटरसह इतर आरोपींची जमवाजमवी, त्यांना आर्थिक मदतीसह कट यशस्वी करणे, त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे आदी सर्व जबाबदारी अनिल पंडितने घेतली होती. अटकेत असलेले आरोपी त्याच्याच संपर्कात होते. शूटरला शस्त्रे दिल्यानंतर सुमीत आणि कुणालने त्याला कॉल करुन काम झाल्याची माहिती दिली होती.

मुंबई-सोनीपत प्रवासादरम्यान अनिलचा कुणालला कॉल आला आणि त्याने तिन्ही शूटरला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याची व्यवस्था करण्यास सांगितले होते. ते पकडले जाऊ नये म्हणून त्यांना सोनीपत येथे पळून जाण्यास सांगितले होते. आतापर्यत चौकशीत अनिल पंडित हाच मुख्य मास्टरमाईंड असल्याचे उघडकीस आले आहे. तशी कबुलीच गुरुवारी मुंबई पोलिसांकडून किल्ला कोर्टात देण्यात आली. अनिल सध्या अमेरिकेत वास्तव्यास असून तो लॉरेन्स बिष्णोईचा अत्यंत जवळचा सहकारी असल्याचे बोलले जाते. त्याच्याच सांगण्यावरुन त्याने हा गोळीबार घडवून आणला होता. त्यामुळे त्याच्याविषयी जास्तीत जास्त माहिती काढण्याचे काम सुरु आहे. त्याला विदेशातून भारतात आणण्यासाठी लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page