मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परताव्याच्या आमिषाने घातला गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, दि. २१ (प्रतिनिधी) – दिड कोटीच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस दिड वर्षांनी ओशिवरा पोलिसांनी अटक केली. साजिद निसार कोटावाला ऊर्फ जयेश शाह असे या आरोपीचे नाव असून या गुन्ह्यांत अटक झालेला तो दुसरा आरोपी आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत नारायण पोशय्या गारिंगे याला पोलिसांनी अटक केली होती. इतर तीन ते चार आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चागला परतावा देतो असे सांगून एका ज्वेलर्स व्यापार्याला गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अनिल कन्हैय्यालाल सोनार हे ज्वेलर्स व्यापार असून सध्या ते त्यांच्या कुटुंबियासोबत कुर्ला परिसरात राहतात. त्यांच्या मालकीचे कुर्ला येथे अनिल गोल्ड नावाचे एक शॉप असून ते होलसेलमध्ये सोन्याच्या दागिन्यांची खरेदी-विक्री करतात. विविध ज्वेलर्स व्यापार्याकडून ऑर्डर घेऊन ते त्यांना विविध डिझाईनचे सोन्याचे दागिने बनवून देतात. गेल्या काही वर्षांत या क्षेत्रात कार्यरत असल्याने त्यांची अनेक व्यापार्यासह लोकांशी चांगले संबंध होते. त्यांच्या मालकीचे कुर्ला येथे एक फ्लॅट होता, या फ्लॅटची त्यांना विक्री करायची होती. याच दरम्यान त्यांची रविंद्र शिंदेशी ओळख झाली होती. तो स्वत इस्टेट एजंट होता तसेच त्याची इतर इस्टेट एजंटशी चांगली ओळख होती.
जुलै २०२३ रोजी त्याने त्यांच्या फ्लॅटची ४५ लाखांना विक्री केली होती. या व्यवहारानंतर त्यांची चांगली मैत्री झाली होती. त्याने त्यांना मार्केटमध्ये दिड कोटीची गुंतवणुक केल्यास त्यांना वीस टक्के जास्त रक्कम किंवा २५ टक्के सोने मिळत असल्याचे सांगितले. तो अशा प्रकारे व्यवहार करणार्या व्यक्तींना ओळखत असून त्यांनी त्यात गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परतावाा मिळेल असे सांगितले. काही दिवसांनी त्याने त्यांची एका व्यक्तीशी ओळख करुन दिली. तो एका कन्स्ट्रक्शन कंपनीचा मालक होता. त्याचे अंबरनाथ, टिटवाळा, बदलापूर येथे काही इमारतीचे बांधकाम प्रोजेक्ट सुरु असल्याचे सांगितले होते. तिथेच त्याची नारायण गारिंगेशी ओळख झाली होती.त्याने तो एका खाजगी कंपनीत सीईओ असून तो अनेकांचे पैसे गुंतवणुक करतो. त्यातून त्यांना २० ते २५ टक्के परतावा देत असल्याचा दावा केला होता. त्यांचा विश्वास बसावा म्हणून त्यांनी बोगस गुंतवणुकदारा दाखवून ते त्यांच्याकडे दिड कोटी रुपये गुंतवणुक करत आहेत असा चित्र दाखविण्याचा प्रयत्न केला होता.
यावेळी त्यांनी मोबाईलवर कोणाला तरी कॉल केला होता. त्यानंतर नारायणच्या मोबाईलवर दोन ९० लाखांच्या स्लीप आल्या. पेमेंट झाल्यानंतर अवघ्या काही तासांत संबंधित गुंतवणुकदाराच्या बँक खात्यात एक कोटी ऐंशी लाख रुपये जमा झाले होते. तसा मॅसेज त्याला बँकेकडून आला होता. त्यामुळे अनिल सोनार यांना त्यांच्यावर विश्वास बसला होता. ऑक्टोंबरला रविंद्रने त्यांना पुन्हा ठाण्यात आणले होते. तिथेच त्यांना एका व्यक्तीने पाच कोटी रुपये दिले होते. यावेळी नारायणने पुन्हा एका व्यक्तीला कॉल करुन पेमेंट मिळाल्याचे सांगितले. काही वेळानंतर त्या व्यक्तीच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली होती. इतकेच नव्हे तर त्यांनी त्याला तीन कोटीचे पाच किलो सोने दिले होते. अशाच प्रकारे त्यांनी बोरिवली आणि जोगेश्वरी परिसरात काही लोकांना गुंतवणुकीवर काही तासांत परताव्यासह मूळ रक्कम दिली होती.
यावेळी त्यांनी त्यांनाही मार्केटमध्ये पैसे गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यांचयवर विश्वास ठेवून त्यांनी त्यांच्याकडे ५० लाखांचे ९०५ ग्रॅम वजनाचे विविध सोन्याचे दागिने आणि एक कोटीची कॅश असा दिड कोटी रुपयांची गुंतवणुक केली होती. हा संपूर्ण व्यवहार मालाड येथील हिरापन्ना शॉपिंग मॉलमध्ये झाला होता. यावेळी त्यांच्यासोबत जयेश शाह ऊर्फ साजिद कोटावाला हा उपस्थित होता. काही वेळानंतर रविंद्रच्या व्हॉटवर ९०-९० लाखांचे दोन स्लीप आले होते. त्याने त्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर झाल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम बँक खात्यात जमा झाली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे विचारणा केली, यावेळी रविंद्र आणि नारायणने उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली तर जयेश शाह तेथून पळून गेला. विवेक राठोड हा मरिनड्राईव्ह येथील कार्यालयातून सोने आणि कॅश घेऊन येतो असे सांगितले. मात्र बराच वेळ होऊन तो तिथे आला नाही. त्यानंतर या दोघांनी त्यांना विवेकला पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान ताब्यात घेतले आहे.
त्यांनी त्याला घरी जाण्याचा सल्ला देत त्यांचे पेमेंट दुसर्या दिवशी बँकेत जमा होईल असे सांगितले. मात्र दुसर्या दिवशी ही रक्कम बँकेत जमा झाली नाही. त्यांनी संंबंधित आरोपींना कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही, काही वेळानंतर त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. त्यामुळे अनिल सोनार हे ओशिवरा येथील हिरापन्ना शॉपिंग मॉलमधील जयेश शाहच्या कार्यालयात गेले, मात्र त्यांना ते कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. मार्केटमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देऊन या टोळीने चांगला परताव्याच्या आमिषाने त्यांची दिड कोटीची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी संबंधित आरोपीविरुद्ध ओशिवरा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नारायण पोशय्या गारिंगे, जयेश शाह ऊर्फ साजिद कोटावाला, रविंद्र बाबूराव शिंदे, विवेक राठोडसह इतर आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी पळून गेले होते. याच दरम्यान नारायणला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने त्याच्या इतर सहकार्यांच्या मदतीने ही फसवणुक केली होती. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या इतर आरोपींचा पोलीस शोध घेत होते. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दिड वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या जयेश शाह ऊर्फ साजिद कोटावाला याला पोलिसांनी अटक केली. तपासात त्याने फसवणुकीची काही रक्कम स्वतकडे ठेवल्याची कबुली दिली. या टोळीने फसवणुकीसाठी अनिल सोनार यांचा विश्वास संपादन केला होता. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन ही फसवणुक केली होती. पोलीस कोठडीनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.