हत्येच्या प्रयत्नाच्या दुसर्‍या गुन्ह्यांत रिझवान कुरेशीला अटक

चौदा वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२१ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – पाण्याच्या बाटलीवरुन झालेल्या वादातून जिशान सैफुल मोला या चौदा वर्षांच्या मुलाच्या गळ्यावर चाकूने हल्ला करुन पळून गेलेल्या रिझवान युसूफ कुरेशी नावाच्या आरोपीस मालवणी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध यापूर्वी पोलिसांनी हत्येसह हत्येच्या गुन्ह्यांत अटकेची कारवाई केली होती. आता त्याला दुसर्‍या हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली असून याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना शुक्रवारी १८ सप्टेंबरला मध्यरात्री साडेबारा वाजता मालाडच्या मालवणीतील गेट क्रमांक सहा, न्यू कलेक्टर कंपाऊंड, हाथी गार्डनजवळ घडली. याच परिसरात जिशान हा चौदा वर्षांचा मुलगा राहतो. रात्री साडेबारा वाजता तिथे रिझवान आला होता. त्याने जिशानकडे पाणी मागितले होते, यावेळी त्याने त्याला बाटलीतून पाणी दिले होते. मात्र पाण्याची बाटली परत न केल्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी काही कळण्यापूर्वीच त्याने त्याच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला होता. त्यात त्याच्या गळ्यासह हाताला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर रिझवान हा तेथून पळून गेला होता.

रक्तबंबाळ झालेल्या जिशानला स्थानिक रहिवाशांनी तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु होते. या घटनेनंतर रिझवानने अशाच प्रकारे पाण्यासह पैशावरुन बंटी नकू खान या पंधरा वर्षांच्या मुलावर चाकूने हल्ला केला होता. त्यात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येनंतर त्याने चेतन पटेल या व्यक्तीवर चाकूने हल्ला केला होता. याप्रकरणी रिझवानविरुद्ध हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. चेतन पटेलवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याला स्थानिक रहिवाशांनी पकडून मालवणी पोलिसांच्या स्वाधीन केले होते.

याच गुन्ह्यांत पोलीस कोठडीत असताना त्याने जिशान मोला या मुलावर चाकूने हल्ला केल्याची कबुली दिली होती. या घटनेनंतर जिशानची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्यावर चाकू हल्ला करणारा रिझवान असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रिझवानविरुद्ध २२ सप्टेंबरला उशिरा दुसरा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला शनिवारी मालवणी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page