शहरात दोन वेवगेगळ्या अपघातात अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू
पंधरा वर्षांच्या मुलासह बाईकस्वाराविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात एका अल्पवयीन मुलासह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना वांद्रे आणि जोगेश्वरी परिसरात घडली. मृतांमध्ये केतन वालजी कटारिया (३१) आणि कॅफिस मोहम्मद असील शहा (१५) यांचा समावेश आहे. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी एका पंधरा वर्षांच्या मुलाविरुद्ध तर खेरवाडी पोलिसांनी नोमान साजिद सय्यद २५ वर्षांच्या बाईकस्वाराविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिला अपघात बुधवारी रात्री उशिरा सव्वाबारा वाजता जोगेश्वरीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, साऊथ बॉण्ड फ्लायओव्हरजवळ झाला. सुप्रिया लक्ष्मण जगदाळे या महिला पोलीस शिपाई असून त्या भांडुप परिसरात राहतात. सध्या त्या जोगेश्वरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. बुधवारी रात्री त्या रात्रपाळीवर कर्तव्यावर हजर झाल्या होता. रात्री उशिरा साऊथ बॉण्ड फ्लायओव्हरजवळ अपघात झाल्याची माहिती प्राप्त होताच जोगेश्वरी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना झाले होते. घटनास्थळी पोलिसांना तीन अल्पवयीन जखमी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना जवळच्या ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
तिथे कॅफिस शहा या मुलाला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर हयातअली आणि आयुब यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. चौकशीत हयातअलीसह त्याचे दोन्ही मित्र जोगेश्वरी परिसरात राहतात. रात्री उशिरा ते तिघेही त्यांच्या बाईकवरुन फेरफटका मारण्यासाठी निघाले. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरुन अंधेरीच्या दिशेने जाताना त्याची बाईक मेट्रो पोल क्रमंाक ७२०/७२१ जवळ आली होती. याच दरम्यान हयातअलीचा बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने डिवायडरला जोरात धडक दिली. त्यात ते तिघेही जखमी झाले होते. त्यापैकी कॅफीन शहा याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुप्रिया जगदाळे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हयातअलीविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून कॅफिसच्या मृत्यूस तर स्वतसह इतर एका मित्राला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरा अपघात बुधवारी २१ ऑक्टोंबरला सकाळी सव्वासहा वाजता वंद्रे येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वाकोला उड्डाणपुलाजवळील दक्षिण वाहिनीवर झाला. सुनिल भानुदास नागमल हे सांताक्रुज येथे राहत असून खेरवाडी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी रात्री आठ वाजता ते रात्रपाळीवर हजर झाले होते. दुसर्या दिवशी सकाळी सव्वासहा वाजता वाकोला उड्डाणपुलाजवळ एक अपघात झाला असून पोलीस मदतीची गरज आहे असा कॉल पोलिसांना प्राप्त झाला होता. या कॉलनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी पोलिसांना दोन तरुण जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे या दोघांनाही तातडीने पोलिसांनी जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथै एका तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
चौकशीअंती या तरुणाचे नाव केतन वालजी कटारिया असल्याचे उघडकीस आले. तो आर्थर रोड, जे. आर बोरिचा मार्ग परिसरात राहत होता. अपघाताच्या वेळेस तो त्याच्या बाईकवरुन जात होता. यावेळी मागून भरवेगात जाणार्या दुसर्या बाईकने त्याला धडक दिली होती. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. दुसरा बाईकस्वार नोमान साजिद सय्यद याच्या पायाला दुखापत झाली असून त्याच्या हलगर्जीपणाने हा अपघात झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून दुसर्या बाईकस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.