दहशतवाद्यांना आर्थिक मदतीचा आरोप करुन गंडा घालणारा गजाआड
फसवणुकीसाठी सायबर ठगांना बॅक खाती पुरविल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप करुन एका वयोवृद्ध महिलेची एक कोटी अठरा लाखांची फसवणुक केल्याच्या कटातील एका आरोपीला गजाआड करण्यात उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. चंद्रमा श्यामबिहारी गुप्ता असे या २४ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्यावर फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या गुन्ह्यांत इतर आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
भावना महेद्र व्यास ही ७६ वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला दहिसर येथे राहते. ६ सप्टेंबरला तिला एका एका अज्ञात व्यक्ती तिला कॉल करुन तो क्रॉफर्डमार्केट येथील गुन्हे शाखेतून बोलत असल्याचे सांगितले. त्याने तिच्या पतीविषयी माहिती विचारली असता तिने तिच्या पतीचे २०१४ रोजी निधन झाल्याचे सांगितले. त्याने तिच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगची एक केस दाखल असून त्यांनी दशहतवाद्यांना आर्थिक मदत केल्याचा आरोप आहे. २०२५ रोजी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटात तिने दहशतवाद्यांना पैशांची मदत केली होती. त्यामुळे तिला कुलाबा येथील मुख्यालयात यावे लागेल, तिथेच तिची चौकशी होईल, त्यात दोषी आढळल्यास तिच्यावर अटकेची कारवाई करण्याची धम्की दिली होती. त्यानंतर तिच्याशी इतर काही लोकांनी व्हिडीओ कॉल करुन चौकशी सुरु केली होती.
तिच्या आर्थिक व्यवहाराची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी एकाने ती वयोवृद्ध असल्याने तिच्यावर अटकेची कारवाई होणार नाही, मात्र चौकशी होईपर्यंत ती डिजीटल अरेस्ट असेल, तोपर्यंत तिला कोणाशी संपर्क साधता येणार नाही. ही गोपनीय चौकशी असल्याने या चौकशीबाबत कोणाशी चर्चा करु नये असे सांगण्यात आले होते. याच व्यक्तीने तिला तिच्या बँक खात्यातील रक्कम एका बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितले. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तिची संपूर्ण रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करु असे सांगितले. मनी लॉड्रिंग, दिल्ली बॉम्बस्फोट, दशहतवाद्यांना आर्थिक मदत तसेच अटकेच्या भीतीने ती प्रचंड घाबरली आणि तिने समोरील व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या बँक खात्यात १ कोटी १८ लाख ५० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.
ही रक्कम ट्रान्स्फर केल्यानंतर तिची चौकशी बंद झाली होती. या संपूर्ण घटनेने ती प्रचंड घाबरली होती, त्यामुळे तिने तिच्या मुलीला घडलेला प्रकार सांगितला. ही माहिती ऐकून तिला धक्काच बसला होता. तिची अज्ञात सायबर ठगाने फसवणुक केल्याचे सांगून तिने तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तीन अज्ञात सायबर ठगाविरुद्ध खंडणी, फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत चंद्रमा गुप्ता या तरुणाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच बँकेत खाते उघडून या खात्याची माहिती गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांना दिल्याची कबुली दिली. बँक खात्याची डिटेल दिल्यानंतर त्याच्या खात्यात फसवणुकीची काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ती रक्कम त्याने सायबर ठगांना पाठविली होती. त्यासाठी त्याला ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. तपासात हा उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.