शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने सव्वाकोटीची ऑनलाईन फसवणुक

अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगून एका शारजा येथील नामांकित कंपनीत सिनिअर कमिस्ट असलेल्या व्यक्तीची अज्ञात सायबर ठगाने सुमारे सव्वाकोटी रुपयांची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या अधिकार्‍याच्या वतीने त्यांच्या कॉलेज मुलाने उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केल्यानंतर संबंधित अज्ञात सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. शारजाहून मुंबईत आल्यानंतर तक्रारदाराच्या वडिलांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे.

१९ वर्षांचा तक्रारार तरुण त्याच्या वयोवृद्ध आजीसोबत बोरिवली येथे राहत असून तो सध्या शिक्षण घेतो. तिचे आई-वडिल विदेशात नोकरी करतात. २० ऑगस्टला त्यांच्या वडिलांना एका महिलेने कॉल करुन शेअरमार्केटविषयी माहिती दिली होती. ते इच्छुक असल्यास त्यांना एक लिंक पाठवत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी ती लिंक ओपन केली. त्यानंतर ते एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड झाले होते. त्यात ९६ हून अधिक सभासद होते, गु्रपमध्ये शेअरमार्केटविषयी माहिती सांगून कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास फायदा होईल असे सांगण्यात येत होते. काही दिवसांनी त्यांनी त्यांना शेअरमध्ये गुंतवणुक करण्याचा सल्ला देताना त्यांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते.

ही कंपनी सेबी रजिस्ट्रर असल्याने त्यांनीही कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. २० ऑगस्ट ते ६ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत त्यांनी विविध शेअरमध्ये १ कोटी २४ लाख ९० हजाराची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना मूळ रक्कमेसह प्रॉफिट म्हणून ६ कोटी १९ लाख ६५ हजार मिळाले होते. ही रक्कम त्यांच्या कंपनीच्या खात्यात जमा असल्याचे सांगण्यात आले. मात्र या खात्यातून त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर होत नव्हती. वारंवार प्रयत्न करुनही त्यांना यश आले नाही. त्यामुळै त्याच्या वडिलांनी संबंधित व्यक्तींना त्यांची रक्कम त्यांच्या खात्यात विड्रॉल करण्याची रिक्वेस्ट पाठविली होती. यावेळी त्यांनी त्याची रक्कम मोठी असल्याने त्यांना आधी पाच टक्के रक्कम टॅक्स म्हणून भरावी लागेल असे सांगितले.

टॅक्सची रक्कम जमा झाल्याशिवाय ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होणार नाही असे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांना प्रतिसाद देणे बंद केले, त्यांचे मोबाईल बंद असल्याचे दिसून आले. त्यामुळे वडिलांच्या वतीने त्यांच्या तक्रारदार मुलाने उत्तर सायबर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page