मर्डरच्या गुन्ह्यांतील तीन आरोपींना एमडी ड्रग्जसहीत अटक

तिघांकडून तीन कोटीचे १ किलो एमडी ड्रग्जचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – मर्डरच्या गुन्ह्यांतील तीन आरोपींना एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत घाटकोपर युनिटच्या ऍण्टी नारकोटिक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी १ किलो २८ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत तीन कोटी आठ लाख चाळीस हजार रुपये इतकी आहे. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन या तिघांनाही किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात ते तिघेही नालासोपारा येथून एमडी ड्रग्ज मुंबईत विक्रीसाठी घेऊन आल्याचे उघडकीस आले आहे.

घाटकोपर युनिटचे ऍण्टी नारकोटीक्स सेल शनिवारी रात्री बोरिवलीतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, नॅशनल पार्कजवळील कृष्णा कॉम्प्लेक्स सोसायटीजवळ गस्त घालत होते. यावेळी तिथे पोलिसांनी तीन तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आले. त्यामुळे या तिन्ही तरुणांना पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना १ किलो २८ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ३ कोटी ८ लाख ४० हजार रुपये आहे.

चौकशीत ते तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध विरार आणि तुळींज पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र मर्डरच्या गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुन्ह्यांत जेलमध्ये असताना त्यांची ओळख झाली होती. या ओळखीनंतर ते तिघेही चांगले मित्र झाले होते. काही महिन्यापूर्ंवीच त्यंांना कोर्टाने जामिन मंजूर केला होता.

जामिनावर बाहेर आल्यानंतर झटपट पैशांसाठी त्यांनी ड्रग्ज विक्रीचा निर्णय घेतला होता. त्यापैकी एका आरोपीने यापूर्वीही ड्रग्जची विक्री केली होती. त्यानंतर त्याने इतर दोघांच्या मदतीने नालासोपारा येथून एमडी ड्रग्जचा साठा घेतला होता, त्याची विक्रीसाठी ते तिघेही बोरिवली परिसरात आले होते, मात्र ड्रग्जची विक्री करण्यापूर्वीच या तिघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिन्ही आरोपींना किल्ला कोर्टाने शुक्रवार ३० ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिजीत अहिरराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघ, पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील, संदीप रहाणे,पोलीस हवालदार संदीप शिंदे, संदीप वाडिले, सुभाष चव्हाण, दिप यशवंते, संदीप रावते, किसन गोमासे, पोलीस शिपाई राहुल पंडित, लहू गर्जे, निलेश ठाकूर आदी पथकाने केली.

वांद्रे येथून दिड कोटीच्या चरससह आरोपीला अटक
दुसर्‍या कारवाईत गुन्हे शाखेच्या वांद्रे ुयुनिटच्या अधिकार्‍यांनी फरहान नावाच्या एका ४० वर्षांच्या आरोपीस अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी दिड कोटीचे १ किलो ५०५ ग्रॅम वजनाचा चरसचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला किल्ला कोर्टाने २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फरहान हा वांद्रे येथे राहत असून तो त्याच्या राहत्या घरातून ड्रग्ज विक्री करत असल्याची माहिती वांद्रे युनिटला मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन पुराणिक यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील, ऋषिकेश बाबर, सहाय्यक फौजदार सुभाष शिंदे, पोलीस हवालदार राहुल पवार, पोलीस शिपाई राकेश कदम, रविंद्र वाघमारे, महिला पोलीस शिपाई पूनम जगताप आदी पथकाने फरहानला त्याच्या राहत्या घरातून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी १ किलो ५०५ ग्रॅम वजनाचा चरसचा साठा जप्त केला. त्याची किमत सुमारे दिड कोटी रुपये इतकी आहे. या गुन्ह्यांत त्याला त्याचा एक मित्र मदत करत होता. त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे.

कोडेन कफ सिरफसह तरुणाला अटक्
तिसर्‍या कारवाईत वरळी युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यानी अन्य एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी कोडेन कफ सिरफचा साठा जप्त केला. चेंबूर येथील आर. सी मार्ग, मोनोरेल स्टेशनजवळील काहीजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरळी युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण वाघ व अन्य पोलीस पथकाने तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री उशिरा तिथे संशयित आरोपी आला होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील सामानाची पोलिसांनी झडती घेतली होती. त्यात या अधिकार्‍यांना १०० मिलि वस्तुमानाच्या कोडेन कफ सिरफच्या ७५ बाटल्या सापडल्या. त्याची किंमत ७५ हजार रुपये इतकी आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page