अमेरिकेच्या खाजगी कंपनीच्या रिसर्च संचालकाला २७ लाखांना गंडा

बँक खात्यासह ओटीपी क्रमांक शेअर केले नसताना फसवणुक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – अमेरिकेतील एका नामांकित खाजगी कंपनीत रिसर्च संचालक म्हणून काम करणार्‍या वयोवृद्धाची अज्ञात सायबर ठगांनी सुमारे २७ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी माहिती काढताना बँक खात्यासह ओटीपी क्रमांक शेअर केला नसताना त्यांच्या खात्यातून तीन ऑनलाईन व्यवहार करुन ही फसवणुक झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अमेरिकेतून मुंबईत आल्यानंतर तक्रारदाराच्या तक्रारीवरुन पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून त्याचा तपास पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांला सोपविला आहे.

७२ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अमीत राजेंद्र शहा हे त्यांची पत्नी विणा, मुलगी शितल यांच्यासोबत अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहत असून ग्रॅट इंडस्ट्रिज कंपनीत रिसर्च संचालक तर त्यांची मुलगी डॉक्टर म्हणून काम करते. त्यांच्या मालकीचे अंधेरीतील शेरे-ए-पंजाबमध्ये एक फ्लॅट आहे. मुंबईत आल्यानंतर ते त्यांच्या अंधेरीतील फ्लॅटमध्ये राहतात. २ सप्टेंबरला अमेरिकेत असताना त्यांना त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर करायची होती. त्यामुळै त्यांनी पत्नीच्या डेबीट कार्डच्या मागे असलेल्या अधिकृत कस्टमर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी समोरील बोलणार्‍या विशाल नावाच्या एका व्यक्तीने त्यांना मदत करतो असे सांगून त्यांना त्याच्या पर्सनल क्रमांकावर संपर्क साधतो असे सांगितले.

काही वेळानंतर त्याने त्यांना कॉल केला होता. त्याने तो त्यांच्या बँकेतून बोलत असल्याचे सांगून पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी त्यांच्या पत्नीचा कस्टमर आयडी घेतला. यावेळी त्याने त्यांच्या खात्याची लिमिट वाढवून अमेरिकेचे बँक खाते लाभार्थी म्हणून ऍड केल्याचे सांगितले. बँकेच्या कस्टमर हेल्पलाईन क्रमांकावर त्यांनी कॉल केला, त्यामुळे तो बॅक अधिकारी समजून त्यांनी त्याला माहिती दिली होती. काही वेळानंतर त्याने त्यांच्या पत्नीला कॉल केला होता. त्याने तिला बँकेच्या विलेपार्ले येथील मॅेनजरला संपर्क साधण्यास सांगितले. तिने मॅनेजरला कॉल केल्यानंतर त्याने तिला भूमिका या महिलेशी बोला असे सांगितले. तिने भूमिकाला कॉल करुन विशाल हा बँकेचा कर्मचारी आहे का याबाबत विचारणा केली,

मात्र तिने काहीच उत्तर न देता कॉल कट केला. त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहितीसह ओटीपी कोणालाही शेअर केली नव्हती. तसेच पैसे पाठविण्यास सांगितले नव्हते. तरीही त्यांच्या बँक खात्यातून ९ सप्टेंबरला ११ लाख, १० सप्टेंबरला १ लाख ४२ हजार आणि १४ हजार ५९ हजार ट्रान्स्फर झाले होते. अशा प्रकारे तीन ऑनलाईन व्यवहारात त्यांच्या बँक खात्यातून सुमारे २७ लाख रुपयांचा व्यवहार झाला होता. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्या बँकेत संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी ही रक्कम दुसर्‍या बँकेच्या एका बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे सांगितले. ते तिन्ही व्यवहार त्यांनी केले नसून त्यांची ऑनलाईन फसवणुक झाली आहे, त्यामुळे त्यांचे दोन्ही बँक खाते फ्रिज करण्याची विनंती केली होती.

बँक अधिकार्‍यांनी त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी एनसीसीआर पोर्टलवर तक्रार केली होती. अमेरिकेहून मुंबईत आल्यानंतर त्यांनी पश्‍चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिथेही तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली आहे त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page