डॉक्टरच्या घरी सोळा लाखांच्या कॅशवर २० वर्षांच्या मोलकरणीचा डल्ला
राहणीमानात झालेला बदलासह सीसीटिव्ही फुटेजमुळे चोरीचा पर्दाफाश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – ताडदेव येथे राहणार्या एका डॉक्टरच्या घरी काम करणार्या २० वर्षांच्या मोलकरणीने सुमारे सोळा लाखांच्या कॅशवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी निकिता लहू बडे या तरुणीविरुद्ध ताडदेव पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. गेल्या सहा महिन्यांत निकिताच्या राहणीमानात झालेला बदल आणि घरातील सीसीटिव्ही फुटेजमुळे या चोरीचा पर्दाफाश झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी निकिताला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स पाठविण्यात आले असून तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
३९ वर्षाचे मिहीर केतन उपाध्याय हे व्यवसायाने डॉक्टर असून ते त्यांच्या पत्नी शिपरा आणि सहा वर्षांचा मुलगा वनशिव यांच्यासोबत ताडदेवच्या फॉर्जेट हिल रोडचय इंटरप्राईज अपार्टमेंटमध्ये राहतात. ते ऑर्थोपेडिक डॉक्टर असून विविध हॉस्पिटलसाठी काम करतात. त्यांची पत्नी शिपरा हीदेखील रेडीओलॉजिस्ट म्हणून काम करते. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्याकडे निकीता ही घरकाम करत असून त्यासाठी तिला दरमाह बारा हजार वेतन दिले जाते. सकाळी साडेनऊ वाजता ते रात्री आठ असा तिच्या कामाची वेळ आहे. गेल्या सहा महिन्यांत निकिताच्या राहणीमानात प्रचंड बदल झाला होता. तिने नवीन आयफोन पंधरा घेतला होता, कामावर येताना ती महागडे कपडे घालत होती. अनेकदा ती तिच्या परिचितांसाठी महागडे गिफ्ट घेत होती.
हा बदल मिहीरसह त्यांच्या पत्नीच्या निदर्शनास आला होता. मात्र निकिता ही त्यांच्याकडे दोन वर्षांपासून काम करत असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. २२ ऑक्टोंबरला त्यांनी त्यांच्या व्यवसायाशी संबंधित काही महत्त्वाचे कागदपत्रे कपाटात ठेवली होती. ती कागदपत्रै नंतर त्यांना कपाटात सापडले नाही. तसेच कपाटातील काही कॅश दिसून आली नाही. कपाटातील अस्ताव्यस्त झालेल्या कागदपत्रासह इतर वस्तूंची झालेली हालचाल संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या पत्नीला ही माहिती सांगितली. त्यामुळे त्यांनी घरातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केली होती. २८ सप्टेंबरला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका फुटेजमध्ये निकिता ही चावीने कपाट उघडत असून कॅश चोरी करुन तिच्या खिशात टाकताना दिसून आली.
हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना त्यांच्या घरी निकिता ही चोरी करत असल्याचे खात्री पटली होती. त्यामुळे त्यांनी कपाटातील कॅशची पाहणी केली असता त्यात सुमारे सोळा लाख रुपये मिसिंग असल्याचे दिसून आले. या घटनेनंतर त्यांनी निकिताकडे चौकशी सुरु केली होती. सीसीटिव्ही फुटेजमध्ये ती चोरी करताना दिसून येत आहे. तिने चोरी केलेले पैसे परत केले नाहीतर तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिली होती. पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देताच ती प्रचंड घाबरली आणि तिने कपाटातील टप्याटप्याने काही कॅश चोरी केल्याची कबुली दिली. चोरी करण्यापूर्वी ती सीसीटिव्ही कॅमेरे बंद करत होती. त्यानंतर दरवाज्याच्या मागे असलेली चावी घेऊन ती कपाटातील कॅश चोरी करत होती.
ऑक्टोंबर २०२५ ते ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत तिने ही चोरी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तिच्या कबुलीनंतर मिहीर उपाध्याय यांनी ताडदेव पोलिसांना घडलेला प्रकार सांगून निकिताविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. मिहीर उपाध्याय यांनी त्यांच्या घरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी निकिता चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले आहे. याच गुन्ह्यांत तिची चौकशी होणार आहे.