टायगर श्रॉफ गोळीबारप्रकरणी चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ

गुन्ह्यांतील सर्व अकरा आरोपींची समोरासमोर चौकशी होणार

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – सिनेअभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर गोळीबार करण्यासाठी घातक शस्त्रे पुरविल्याचा आरोप असलेल्या दोन महिलांच्या पोलीस कोठडीत सोमवारी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने या चारही आरोपींना सोमवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी गुन्ह्यांतील सर्व अकरा आरोपींची समोरासमोर चौकशीसह पुरावा गोळा करण्यासाठी आरोपींना २८ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या आरोपींमध्ये राधा सुनिल वर्मा, बबीता राजजतन राव, कुणाल संजयकुमार जमिनसिंग आणि सुमीत बिजेंदर सरोलिया यांचा समावेश आहे.

१८ ऑक्टोंबरला टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबारानंतर दुसर्‍या दिवशीच दिल्ली आणि हरियाणा येथील सोनीपत येथून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने चार आरोपींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत कुणाल आणि सुमीतने पंजाबहून गोळीबारासाठी एक पिस्तूल आणि वीस जिवंत काडतुसे घेतल्याचे उघडकीस आले होते. ते घातक शस्त्रे घेऊन ते राधा आणि बबिता यांच्यासोबत मुंबईत आले होते. दादरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास असताना बबिता आणि राधाने शूटरला घातक शस्त्रे दिले होते. त्यानंतर सुमीत आणि कुणाल सोनीपतला तर बबिता आणि राधा या दोघीही दिल्लीला निघून गेले होते. यावेळी या चौघांनाही पोलिसांनी अटक केली होती.

अटकेनंतर या चौघांचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला सोपविण्यात आला होता. ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने चारही आरोपींना सोमवार २६ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना सोमवारी दुपारी पुन्हा किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकारी वकिलांनी या चारही आरोपींना कटाची संपूर्ण माहिती होती. त्यांनी गोळीबारासाठी शस्त्रे पुरविली होती.

याच गुन्ह्यांत इतर सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे या चारही आरोपींची इतर आरोपीसमोर एकत्र चौकशी करणे गरजेचे आहे. त्यांच्या फोनमधून जप्त केलेल्या डेटाचे विश्‍लेषण करणे बाकी आहे. आरोपी सिग्नल ऍपद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते, ते ऍप त्यांनी नष्ट केले आहे. त्यांच्या फोनवरुन फोटो आणि व्हिडीओ जप्त करण्यात आले आहे. त्यात गोळीबारासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांचाही समावेश आहे. दोन आरोपींच्या आवाजाचे नमूने अद्याप घेतले नाही. ते नमूने घेणे बाकी असल्याचे सांगून चारही आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.

दुसरीकडे बचाव पक्षाच्या वकिलांनी केवळ औपचारिक कारणासाठी पोलीस कोठडी दिली जाऊ शकत नाही. आरोपींची समोरासमोर चौकशीसाठी पोलीस कोठडीची गरज नाही. त्यामुळे आरोपींना पोलीस कोठडी न देता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करावी अशी विनंती केली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने राधा वर्मा, बबिता राव, कुणाल जमिनसिंग आणि सुमीत सरोलिया यांच्या पोलीस कोठडीत बुधवार २८ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे या चौघांनाही बुधवारी पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page