कर्ज असलेल्या फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन फसवणुक

फसवणुकीच्या गुन्ह्यांत फ्लॅटमालक असलेल्या मुख्य आरोपी महिलेस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – दोन वर्षांपूर्वी फ्लॅटच्या खरेदी-विक्री करुन कर्ज असलेल्या फ्लॅटची पुन्हा खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन एका खाजगी कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍याची सुमारे ३७ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी संगीता शशिकांत जाधव नावाच्या ५६ वर्षांच्या महिलेस बोरिवली पोलिसांनी अटक केली. संगीता ही फ्लॅट मालकीण असून तिच्यासोबत तिची बहिण रेश्मा गणेश जाधव आणि विजय हे दोघेही सहआरोपी आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत संगीताला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अमोल पांडुरंग आवारी हे विरारच्या ग्लोबल सिटीमध्ये राहत असून पवईतील एका खाजगी कंपनीत आसोशिएट म्हणून काम करतात. त्यांची पत्नी पूजा हीदेखील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. घरापासून कामाचे ठिकाण लांब असल्याने त्यांनी उत्तर मुंबईत फ्लॅट खरेदीसाठी प्रयत्न सुरु केले होते. याच दरम्यान त्यांना एका सोशल साईटवर गोराईतील फ्लॅटची जाहिरात दिसली होती. या जाहिरातीमध्ये विजय नावाच्या एका एजंटचा मोबाईल क्रमांक होता. त्यामुळे त्यांनी विजयला संपर्क साधला होता. मोबाईलवर फ्लॅटशी सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनी बोरिवलीतील गोराई, प्लॉट क्रमांक ९८, श्री सदगुरु सहकारी सोसायटीचा फ्लॅट पाहिला होता. हा फ्लॅट संगीता जाधव व तिची बहिण रेश्मा जाधव यांच्या मालकीचा होता.

त्यांच्यात फ्लॅटचे खरेदीखताचे रजिस्ट्रेशनसह खरेदी-विक्रीचा ८५ लाखांचा व्यवहार झाला होता. त्यापैकी पाच लाख टोकन, २२ लाख कॅश तर उर्वरित रक्कम धनादेशाद्वारे तसेच पूर्ण पेमेंट प्राप्त होताच दोन महिन्यांत फ्लॅटचा ताबा देण्याचे ठरले होते. याबाबत त्यांच्यात एमओयू झाला होता. ठरल्याप्रमाणे त्यांनी संगीता आणि रेश्मा जाधव यांना टप्याटप्याने फ्लॅटसाठी ५० लाख आणि रजिस्टेशनसाठी साडेसहा लाखांचे पेमेंट केले होते. उर्वरित रक्कम ते एका खाजगी पंतसंस्थेकडून घेणार होते. सर्व प्रोसेस सुरु असताना त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅटचा ताबा मागितला, मात्र संगीता आणि रेश्माने त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. दोन महिने उलटूनही फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले नाही. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी या दोन्ही बहिणीने फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द केला. तसेच त्यांचे पैसे व्याजासहीत परत करण्याचे आश्‍वासन दिले. त्यासाठी त्यांनी अमोल आवारी यांना काही धनादेश दिले,

मात्र ते धनादेश बँकेत टाकू नका असे सांगितले. काही दिवसांनी तिने ऑनलाईन पेमेंट करते असे सांगूनही पेमेंट केले नाही. याच दरम्यान अमोल आवारी यांना या फ्लॅटची संगीता आणि रेश्माने मे २०२४ रोजी दुसर्‍या व्यक्तींना विक्री केली होती. त्यांच्यासोबत फ्लॅट रजिस्ट्रेशन झाले होते. फ्लॅटवर एका बँकेचे १ कोटी १७ लाखांचे कर्ज होते. मात्र कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने फ्लॅटवर जप्तीची कारवाई सुरु केली होती. हा प्रकार समजताच अमोल आवारी यांनी त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. त्यामुळे संगीता आणि रेश्माने त्यांना तेरा लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित ३७ लाखांचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती.

दोन वर्षांपूर्वीच फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता.फ्लॅटवर आधीच कर्ज होते, कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने फ्लॅटवर जप्तीची कारवाई सुरु केली होती. तरीही या दोन्ही बहिणीने विजयच्या मदतीने सोशल साईटवर फ्लॅटची विक्रीची जाहिरात देऊन अमोल आवारी यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी या तिघांविरुद्ध बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रेश्मा जाधव, संगीता जाधव आणि विजय यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच चार महिन्यानंतर फ्लॅटमालक असलेल्या संगीता जाधवला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत रेश्मा जाधव आणि विजय यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page