दिडोंशी कोर्टातून पळून गेलेल्या आरोपीस अटक

पळून गेल्यानंतर जेलमध्ये आत्मसमर्पण केले होते

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत सुनावणीसाठी हजर केल्यानंतर जेलमध्ये नेत असताना एका पोलीस शिपायाच्या हातावर जोरात फटका मारुन पळून गेलेल्या आरोपीला अखेर कुरार पोलिसांनी अटक केली. इब्राहिम साजिद मुजावर असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. दिडोंशी कोर्टातून पळून गेल्यानंतर त्याच रात्री इब्राहिमने आर्थर जेलमध्ये जाऊन आत्मसमर्पण केले होते. त्याच्याविरुद्ध कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा झाल्याने त्याच्यावर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

निखिल निवृत्ती माने हे मिरारोड येथे राहत असून सध्या ताडदेव येथील सशस्त्र पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. शुक्रवारी २३ ऑक्टोंबरला इब्रहिमला पुढील सुनावणीसाठी निखिल माने हे दिडोंशी सेशन कोर्टात घेऊन आले होते. सुनावणी संपल्यानंतर त्याला सायंकाळी पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये नेण्यात येणार होते. सायंकाळी चार वाजता पोलीस व्हॅनजवळ नेत असताना इब्राहिमने निखिल माने यांच्या त्यांच्या हाताला जोरात धक्का देऊन तेथून पलायन केले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्यासह इतर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो सुसाट वेगाने पळून गेला होता.

या घटनेनंतर इब्राहिमविरुद्ध कुरार पोलीस ठाण्यात कायदेशीर रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना रात्री तो आर्थर रोड कारागृहात आला आणि त्याने पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्याला ताब्यात घेऊन पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले. ही माहिती नंतर आंबोली आणि कुरार पोलिसांना देण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने त्याचा नंतर कुरार पोलिसांनी ताबा घेतला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page