रेकी करुन माल भरलेला टेम्पो पळविणार्या त्रिकुटाला अटक
कपड्याच्या गोणीसह कार व टेम्पो आदी मुद्देमाल हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – रेकी करुन माल भरलेला टेम्पो चोरी करुन पळून जाणार्या एका टोळीचा निर्मलनगर पोलिसांनी पर्दाफाश केला. याच गुन्ह्यांत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ते तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. तौकिर जमालुद्दीन खान, उमर जमालुद्दीन खान आणि नावेद इकरार खान अशी या तिघांची नावे असून ते सायनचे रहिवाशी आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांत वापरलेली कार, चोरीचा टेम्पो, आतील १ लाख ६५ हजाराचा कपड्याच्या गोणी आदी मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यांच्या अटकेने निर्मलनगर आणि शाहूनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल झाल्याचे तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे यांनी सांगितले.
१४ ऑक्टोंबरला निर्मलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही अज्ञात व्यक्तींनी कपडण्याची गोणी असलेला टेम्पो चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर निदर्शनास येताच तक्रारदाराने निर्मलनगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत निर्मलनगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सूर्यकांत पारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळगे, पोलीस हवालदार खंडारे, वाघमारे, परदेशी, पोलीस शिपाई भोगले, कदम, कोळी आदी पथकाने तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपींची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असतानाच सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन या पथकाने सायन परिसरातून तौकीर खान, उमर खान आणि नावेद खान या तिघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच माल भरलेला टेम्पो चोरी करुन पलायन केले. अशा प्रकारे गुन्हे करणारे ते तिघेही रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. काही दिवसांापूर्वी त्यांनी शाहूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अशाच प्रकारे भंगार सामान असलेला टेम्पो चोरी करुन पलायन केले होते. त्यानंतर त्यांनी निर्मलनगर पोलीस ठाण्यात हद्दीत चोरी केली होती. चोरी करण्यापूर्वी ते तिघेही त्यांच्या कारमधून रेकी करत होते. रेकी केल्यानंतर त्यातील दोघेजण माल भरलेला टेम्पो चोरी करुन पळून जात होते.
चोरीचा मुद्देमाल स्वस्तात विक्री करुन ते तिघेही पैशांतून मौजमजा करत होते. त्यांच्या अटकेने शाहूनगर आणि निर्मलनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी एक ओला उबेरची टायाटो रुमीनी कार, चोरीचा टेम्पो आणि १ लाख ६५ हजाराच्या कपड्याच्या गोण्या हस्तगत केल्या आहेत. पोलीस कोठडीनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या दोघांचा ताबा लवकरच शाहूनगर पोलिसांकडून घेतला जाणार आहे.