लॉजिंग व्यवसायात गुंतवणुकीच्या बहाण्याने पिता-पूत्राची फसवणुक
६० लाखांच्या फसवणुकीप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२७ ऑक्टोंबर २०२६
मुंबई, – लॉजिंग व्यवसायातील गुंतवणुकीवर दरमाह पन्नास हजाराचा परतावा आणि प्रॉफिटमध्ये पाच टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून उत्तरप्रदेशातील पिता-पूत्राची त्यांच्याच परिचित एका भामट्याने सुमारे ६० लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार साकिनाका परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भास्कर बिहारीलाल दुबे या मुख्य आरोपीविरुद्ध साकिनाका पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. भास्कर दुबेने अशाच प्रकारे व्यवसायात गुंतवणुकीच्या आमिषाने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
रमाकांत रामप्रकाश शुक्ला हे ६५ वर्षांचे वयोवृद्ध मूळचे उत्तरप्रदेश, बरेलीच्या बिसलपूर, ग्रेटर ग्रीन पार्कचे रहिवाशी आहे. शिखर हा त्यांचा मुलगा असून त्याला फिल्म इंडस्ट्रिजमध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे ते त्यांच्या मुलासोबत २०२१ रोजी मुंबईत कामानिमित्त आले होते. त्यावेळेस ते दोघेही साकिनाका येथील हॉटेलमध्ये राहत होते. तिथेच त्यांची हॉटेलचा चालक असलेल्या भास्कर दुबेशी ओळख झाली होती. त्याने तो उत्तरप्रदेशचा रहिवाशी असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. मुलाच्या नोकरीसाठी जास्त विचार करु नका, त्यापेक्षा त्याच्यासोबत लॉजिंग व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यात त्यांना जास्त परतावा मिळेल असे सांगितले. मात्र त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते.
२०२२ रोजी दुसर्यांदा मुंबईत आल्यानंतर त्यांनी त्यांना पुन्हा व्यवसायात गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. यावेळी त्याने त्यांना अंधेरीतील एका हॉटेलमध्ये आणले होते. तिथेच त्याने त्यांची राहण्याची स्वस्तात व्यवस्था केली होती. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. २०२३ भास्कर दुबे हा त्याच्या कुटुंबियांसोबत त्यांच्या गावी गेला होता. यावेळी त्याने त्यांना मुलाच्या नोकरीसाठी व्यवसायात मदत करा, त्यात त्यांना चांगला परताव्याचे आमिष दाखविले होते. मात्र त्यांनी थोडा वेळ देण्याची विनंती केली होती. मे २०२३ रोजी शिखर हा मुंबईत आला होता. यावेळी भास्करने त्याची अंधेरीतील हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. त्याने त्याला नोकरीचा विचार सोडून त्याच्यासोबत लॉजिंग व्यवसायात मदत करण्याची विनंती केली.
त्याच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास त्याला दरमाह ५० हजार आणि प्रॉफिटमध्ये पाच टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखविले होते. भास्करला लॉजिंग व्यवसायाची चांगली माहिती होती. त्यामुळे त्याने त्याच्या वडिलांना सांगून त्याच्यासोबत व्यवसायात गुंतवणुकीची विनती केली होती. ठरल्याप्रमाणे जून २०२३ त्यांच्यात अंधेरीतील एका हॉटेलमध्ये मिटींग झाली होती. त्यात भास्करने साकिनाका येथे सनराईज रेसीडेन्सी लॉजिंग नावाचे एक हॉटेल सुरु करणार असल्याचे सांगितले. त्यात त्यांनी गुंतवणुक करण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे रमाकांत आणि शिखर शुक्ला यांनी भास्करला ५० लाख रुपये दिले होते.
काही दिवसांनी त्याने त्यांच्याकडे हॉटेलच्या इंटेरियरसाठी आणखीन पैशांची मागणी केली होती. त्यामुळे शुक्ला पिता-पूत्राने त्याला दहा लाख रुपये दिले होते. यावेळी त्यांच्यात पाच वर्षांसाठी एमओयू झाला होता. त्यात हॉटेल सुरु झाल्यानंतर भास्कर हा त्यांना दरमाह पन्नास हजार परतावा तसेच प्रॉफिटमध्ये पाच टक्के कमिशन देणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. काही महिन्यानंतर साकिनाका येथे सनराईज रेसीडेन्सी लॉजिंग हॉटेलचे काम सुरु झाले होते. मात्र दोन ते तीन महिने उलटूनही त्याने त्यांना कुठलाही परतावा तसेच प्रॉफिटमध्ये कमिशन दिले नाही. याबाबत त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता.
वेगवेगळे कारण सांगून त्यांची दिशाभूल करत होता. शुक्ला पिता-पूत्रांकडून सतत विचारणा होत असल्याने भास्करने त्यांना कुठलाही परतावा किंवा कमिशन देणार नाही. तसेच गुंतवणुक केलेली रक्कम परत करणार नाही. कोर्टात जाऊन पैशांची वसुली करा अशी धमकी दिली होती. लॉजिंग व्यवसायात गुंतवणुक केल्यास दरमाह पन्नास हजार परतावा आणि प्रॉफिटमध्ये पाच टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून भास्करने तक्रारदार पिता-पूत्रांची साठ लाखांची फसवणुक केली होती.
हा प्रकार लक्षात येताच त्यांनी साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर भास्कर दुबे याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून त्याची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे.