डिलीव्हरीसाठी दिलेल्या मोबाईलसह इतर साहित्यांचा अपहार
मालाड येथील घटना; कंपनीच्या अज्ञात कर्मचार्याविरुद्ध गुन्हा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ मे २०२४
मुंबई, – डिलीव्हरीसाठी दिलेल्या मोबाईलसह मोबाईल ऍसेसेरीज, ब्लूट्यूथ, कपडे, शूज, ब्युटी प्रोडेक्ट, आर्टिफिशियल ज्वेलरी आदी सुमारे साडेअकरा लाख रुपयांच्या पार्सलमधील वस्तूंचा अपहार करुन कंपनीची फसवणुक झाल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. या गुन्ह्यांत कंपनीच्याच कर्मचार्याचा सहभाग उघडकीस आला असून अज्ञात कर्मचार्याविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या कर्मचार्यांनी बॉक्समधील महागड्या वस्तू काढून खाली बॉक्स कार्यालयात जमा करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
यातील तक्रारदार कांदिवली परिसरात राहत असून मालाडच्या काचपाडा, सोनल इंडस्ट्रिजच्या सॅडोफॅक्स टेक्नोलॉजिस प्राव्हेट लिमिटेड कंपनीत असोशिएट लीड म्हणून काम करतो. या कंपनीचे मुख्य कार्यालय बंगलोर येथून इतर शहरात कंपनीच्या शाखा आहेत. मुंबईतील शाखेत २८ कर्मचारी काम करत असून त्यात २५ डिलीव्हरी बॉय आहेत. ही कंपनीत ग्राहकांनी ऑनलाईन ऑर्डर केलेल्या सामानाची डिलीव्हरी करते. सकाळी डिलीव्हरी बॉयला डिलीव्हरीचे सामान दिल्यानंतर सायंकाळी त्यांच्याकडून रिपोर्ट घेतला जातो. अनेकदा ग्राहक ते सामान घेण्यास नकार देतात किंवा ग्राहक डिलीव्हरीच्या वेळेस घरी नसतात. त्यामुळे ते पार्सल पुन्हा कार्यालयात जमा केले जाते. १ एप्रिल ते २७ एप्रिल या कालावधीत ग्राहकांनी वस्तू घेण्यास नकार दिल्याने तसेच काही ग्राहक घरी मिळून न आल्याने त्यांचे पार्सल कार्यालयात जमा करण्यात आले होते. या बॉक्सची पाहणी केल्यानंतर आतील वस्तू चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यात ३३ हून महागड्या मोबाईलसह मोबाईल ऍसेसेरीज, ब्लूट्यूथ, कपडे, शूज, ब्युटी प्रोडेक्ट, आर्टिफिशियल ज्वेलरी आदी सुमारे साडेअकरा लाख रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश होता. हा प्रकार निदर्शनास येताच तक्रारदाराने त्याची तक्रार वरिष्ठांकडे केली होती. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत त्याला पोलिसात तक्रार करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर त्याने कंपनीच्या वतीने मालाड पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मालाड पोलिसांनी कंपनीच्या अज्ञात कर्मचार्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.