व्यावसायिक मित्राला खंडणीसाठी धमकाविणार्या मैत्रिणीला अटक
ब्लॅकमेलद्वारे दोन कोटीसह दोन फ्लॅटची मागणी करुन दिली होती धमकी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१३ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – लैगिंक अत्याचाराची खोटी तक्रार पोलिसांत करण्याची धमकी देऊन एका रियल इस्टेट व्यावसायिकाला त्याच्याच मैत्रिणीने खंडणीसाठी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खंडणीसाठी धमकी देणे, ब्लॅकमेल करुन बदनामी करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच प्रेरणा लोहार नावाच्या आरोपी मैत्रिणीला बीकेसी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तिला वांद्रे येथील लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिने तक्रारदार व्यावसायिकाकडे खंडणी स्वरुपात दोन कोटीच्या कॅशसह अंधेरीतील पॉश परिसरात दोन फ्लॅटची मागणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. मात्र खंडणीसाठी ब्लॅकमेल करणे तिच्या चांगलेच अंगलट आले आहे.
२९ वर्षांचा तक्रारदाराचा रियल इस्टेटचा व्यवसाय असून तो सध्या गोरेगाव परिसरात राहतो. त्यांचा गोरेगावसह वांद्रे येथील भारतनगर परिसरात दोन फ्लॅट आहेत. १८ जुलैला तो त्याच मित्रांसोबत पेनीन्सुअला हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेला होता. रात्री दोन वाजता पार्टी संपल्यानंतर तो त्याच्या घरी निघून गेला होता. दुसर्या दिवशी त्याला त्याच्या एका मित्राने कॉल करुन पार्टीत प्रेरणा लोहार नावाच्या एका तरुणीशी ओळख झाल्याचे सांगून तिचा मोबाईल घेतल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्याच्यासह त्याचाही मोबाईल क्रमांक तिला दिला होता. काही दिवसांनी प्रेरणाने त्याच्या मित्राला कॉल करुन तक्रारदाराला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. २४ जुलैला त्याची प्रेरणासोबत अंधैरीतील एमआयडीसी, पॅराडाईस बाय तुंगा हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेट झाली होती.
या भेटीदरम्यान त्यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली होती. तिने ती बेली डान्सर असल्याचे सांगतले होते. तिने तिची आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याचे सांगून त्याला आयफोन घेण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्याने तिला आयफोन दिला होता. या ओळखीनंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली होती. याच दरम्यान त्यांच्यात संमतीने शारीरिक संबंध आले होते. त्यानंतर ते दोघेही वेगवेगळ्या हॉटैलमध्ये भेटत होते. तिथेही त्यांच्यात अनेकदा संमतीने शारीरिक संबंध आले होते. प्रत्येक वेळेस ती त्यांच्याकडून ५० हजार रुपये घेत होती. ६ सप्टेंबरला तो तिच्यासोबत वांद्रे येथील बीकेसी, जिओ मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेला होता. यावेळी तिने त्यांच्याशी त्यांच्या संबंधाबाबत चर्चा करुन त्यांच्याकडे दोन कोटी आणि अंधेरी येथे दोन फ्लॅट देण्याची मागणी केली होती. मात्र त्यांनी तिला पैशांसह फ्लॅट देणे शक्श नाही असे स्पष्टपणे सांगितले.
त्याचा राग आल्याने तिने त्याला तिची मागणी पूर्ण केली नाहीतर त्याच्याविरुद्ध लैगिंक अत्याचाराची पोलिसांत खोटी तक्रार करण्याची धमकी दिली होती. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. या वादानंतर तो तेथून निघून गेला होता. या घटनेनंतरही ती व्हॉटअपसह कॉलद्वारे त्याला पैशांसह फ्लॅटसाठी धमकी देत होती. १५ ऑक्टोंबरला तक्रारदार त्यांच्या पत्नीसोबत शॉपिंगसाठी गेले होते. यावेळी प्रेरणाने त्याला पुन्हा कॉल करुन लग्नासह पैशांची मागणी केली होती. यावेळी तिने तिची मागणी पूर्ण करावीच लागेल, नाहीतर ती लवकरच पोलिसांत तक्रार करुन त्याला तुरुंगात पाठविणार असल्याचे सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांच्यातील खाजगी फोटो त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांना पाठवून तिने त्यांची बदनामी केली होती.
२४ ऑक्टोंबरला तिने त्यांना अंधेरीतील एका सोसायटीमध्ये आणले. तिथे एक फ्लॅट पाहिल्यानंतर तिने त्याला तो फ्लॅट देण्याची मागणी केली होती. फ्लॅटसाठी ती त्यांच्यावर दबाब आणत होती. पैशांसह फ्लॅट दिला नाहीतर तर त्यांच्यातील संबंधाचे फोटोसह व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली होती. ३ नोव्हेंबरला ती त्याच्या गोरेगाव येथील घरी गेली होती. दारुची बाटली घेऊन तिने त्यांना पत्नीला सोडून तिच्यसोबत येण्यास सांगितले. नाहीतर आता तिला दोन कोटी देण्याची मागणी केली. त्यामुळे त्याने तिला आठ लाख रुपये दिले. प्रेरणाकडून सतत दोन कोटीसह दोन फ्लॅटसाठी धमकी दिली जात असल्याने तो प्रचंड मानसिक तणावात होता. त्यामुळे त्याने तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता.
घडलेला प्रकार बीकेसी पोलिसांना सांगून त्याने प्रेरणाविरुद्ध ब्लॅकमेल करुन खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी तक्रार केली होती. यावेळी त्याने त्यांच्यातील व्हॉटअप चॅटसह मोबाईलमधील संभाषण पुरावे म्हणून सादर केले होते. या संभाषणात तिने त्यांच्यावर पिटा कायद्यासह मानवी तस्करी केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत बीकेसी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. ९ नोव्हेंबरला प्रेरणा ही खंडणीचा दोन लाखांचा दुसरा हप्ता घेण्यासाठी एका हॉटेलमध्ये आली होती.
यावेळी त्यांनी तिला पैसे दिले होते. या घटनेनंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी देणे, बदनामी करुन ब्लॅकमेल करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर प्रेरणा लोहार हिला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर तिला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने तिला सोमवार १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. तिने अशाच प्रकारे इतर काही व्यक्तींना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडे खंडणीची मागणी किंवा त्यांच्याकडून खंडणीची रक्कम वसुली केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.