आजाराने ग्रस्त पतीकडून पत्नीची लोखंडी रॉडने मारहाण करुन हत्या
हत्येनंतर पळून गेलेल्या आरोपी पतीला काही तासांत अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – आजारामुळे चिडचिडपणा आलेल्या एका व्यक्तीने त्याच्याच पत्नीची क्षुल्लक कौटुंबिक वादातून लोखंडी रॉडसह कपडे धुण्याच्या धोपटण्याने मारहाण करुन हत्या केल्याची मानखुर्द परिसरात उघडकीस आली. राजकुमारी श्रीराम सोनी असे या ४९ वर्षांच्या महिलेचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी तिचा पती श्रीराम कालूराम सोनी या ५६ वर्षांच्या आरोपीला मानखुर्द पोलिसांनी अटक केली. हत्येनंतर तो पळून गेला, त्याला काही तासांत मानखुर्द परिसरातून पोलिसांनी अटक केली. हत्येच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. शुक्रवारी घडलेल्या हत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.
शुक्रवारी दुपारी सायन हॉस्पिटलमध्ये एका महिलेला रक्तबंबाळ अवस्थेत आणण्यात आले असून तिच्यावर तिच्याच पतीने लोखंडी रॉडने मारहाण केली आहे असा कॉल मानखुर्द पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यामुळे पोलिसांचे एक पथक सायन हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे गेल्यानंतर पोलिसांना जखमी महिलेला डॉक्टरांनी दुपारी पावणेतीन वाजता मृत घोषित केल्याचे समजले. घटनास्थळी असलेल्या पंकज श्रीराम सोनी या तरुणाची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने मृत महिला त्याची आई राजकुमारी असल्याचे सांगून तिची त्याचे वडिल श्रीराम सोनी यांनी हत्या केल्याचे सांगितले. सोनी कुटुंबिय मानखुर्द येथील जिजामाता भोसले मार्ग, साईबाबा मंदिराजवळील अण्णाभाऊ साठे नगरात राहतात. पंकज हा वडाळ्यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे.
शुक्रवारी तो नेहमीप्रमाणे कामाला गेला होता. दुपारी त्याला त्याच्या वडिलांनी राजकुमारी हिला घरातील क्षुल्लक कारणावरुन शिवीगाळ करुन लोखंडी रॉडसह कपडे धुण्याच्या धोपटण्याने बेदम मारहाण केल्याचे समजले. त्यामुळ तो त्याच्या बहिणीसोबत घरी आला होता. यावेळी त्याला घरी त्याची आई राजकुमारी ही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आली. त्यामुळे त्यांनी तिला आधी गोवंडीतील शताब्दी आणि नंतर सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या हत्येमागे त्याचे वडिल श्रीराम सोनी असल्याचा आरोप करुन हत्येनंतर ते घरातून पळून गेले होते असे सांगितले.
श्रीराम हे गेल्या दहा वर्षांपासून मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या आजाराने त्रस्त होते. या आजारामुळे त्यांचा चिडचिडा स्वभाव झाला होता. अनेकदा क्षुल्लक कारणावरुन ते सर्वांना शिवीगाळ करत होते, हातात मिळेल ती वस्तू फेंकून मारत होते. त्यांचा सर्वांत जास्त राग त्यांची आई राजकुमारीवर निघत होता. तिचा ते नेहमीच मानसिक शोषण करत होते. मात्र त्यांनी पोलिसांत तक्रार केली नव्हती. मात्र शुक्रवारी क्षुल्लक कौटुंबिक वादातून त्याने राजकुमारीची हत्या केली होती.
याप्रकरणी पंकज सोनी याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी त्याचे वडिल श्रीराम सोनी याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. हत्येनंतर आरोपी पळून गेल्याने त्याचा अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना काही तासांत आरोपीला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.