म्हाडा-एमएमआरडीएच्या चार फ्लॅटसाठी घेतलेल्या ४१ लाखांचा अपहार
तीन वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – स्वस्तात म्हाडासह एमएमआरडीएचे प्रत्येकी दोन फ्लॅट देतो असे सांगून एका शिक्षिकेकडून ४१ लाख घेऊन फ्लॅटचा ताबा न देता फसवणुक करणार्या कटातील आरोपीस तीन वर्षांनी खेरवाडी पोलिसांनी अटक केली. निजाम हुसैन शेख असे या वॉण्टेड आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. या गुन्ह्यांत अब्दुल सलाम युसूफ खान, सुंदर लुबाना आणि विरु लुबाना हे तिघेही सहआरोपी असून या चौघांनी संगनमत करुन तक्रारदार शिक्षिकेकडून फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
हुदा अझीझ देशमुख ही तक्रारदार महिला व्यवसायाने शिक्षिका असून ती तिच्या पती आणि दोन मुलांसोबत कुर्ला परिसरात राहते. वांद्रे येथील अंजुमन इस्लाम शाळेत ती शिक्षिका म्हणून काम करते. दहा वर्षापूर्वी तिची अब्दुल खानशी ओळख झाली होती. या ओळखीत त्याने त्याची म्हाडामध्ये चांगली ओळख असून त्याने अनेकांना स्वस्तात म्हाडाचे फ्लॅट दिले आहे. ती इच्छुक असल्यास तिला कुर्ला येथे म्हाडाचा फ्लॅट देतो असे सांगितले. तिचा विश्वास बसावा म्हणून त्याने तिला कुर्ला येथील म्हाडा वसाहतीतील फ्लॅट दाखविला होता. तिच्यासह तिच्या पतीला फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती, त्यामुळे त्यांनी फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्याने त्यांना दोन फ्लॅट देतो असे सांगितले होते, त्यामुळे तिने दोन्ही फ्लॅटसाठी त्याला २४ लाख रुपये दिले होते.
या पेमेंटनंतर त्याने त्यांना फ्लॅटची चावी दिली, मात्र सध्या तिथे राहण्यासाठी जाऊ नका, फ्लॅटचे काम सुरु आहे. काम पूर्ण झाल्यानंतर फ्लॅटचा ताबा घ्या असे सांगितले. फेब्रुवारी २०१७ रोजी ती फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेली होती, मात्र एप्रिल महिन्यांत तिथे एक महिला आली. तिने तो फ्लॅट तिच्या वडिलांच्या मालकीचा असल्याचे सांगून तिला फ्लॅट खाली करण्यास सांगितले. त्यानंतर अब्दुलने त्यांना त्याच माळ्यावरील दुसर्या फ्लॅटमध्ये शिफ्ट केले. याच दरम्यान अब्दुलने फ्लॅट नावावर करण्यासाठी तिच्याकडून आणखीन काही पैसे घेतले होते. काही दिवसांनी त्याने तिची ओळख विरु लुबाना आणि सुंदर लुबानाशी करुन दिली. ते दोघेही एमएमआरडीएचे अधिकारी असून त्यांच्या मदतीने त्याने तिला एमएमआरडीएमध्ये आणखीन दोन फ्लॅट स्वस्तात देण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी तिने त्यांना साडेसात लाख रुपये घेतले होते.
अशा प्रकारे तिने आरोपींना म्हाडासह एमएमआरडीएच्या प्रत्येकी दोन फ्लॅटसाठी, नावावर फ्लॅट करण्यासाठी सुमारे ४१ लाख रुपये दिले होते. मात्र तीन वर्षांत तिला एकाही फ्लॅटचा ताबा दिला नाही. तिच्यावर नावावर फ्लॅट केला नव्हता. विचारणा केल्यानंतर ते चौघेही वेगवेगळे कारण सांगून तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे तिने तिच्याकडे फ्लॅटचा ताबा द्या नाहीतर फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत करा असा तगादा लावला होता.
मात्र त्यांनी तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा पैसेही परत केले नाही. त्यामुळे तिने खेरवाडी पोलिसांत चारही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अब्दुल सलाम खान, सुंदर लुबाना, विरु लुबाना आणि निजाम शेख यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत निजाम हा गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अखेर तीन वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.