स्थानिक नगरसेवक-शाखा अध्यक्ष असल्याची बतावणी करुन फसवणुक
आरोपींविरुद्ध ६१ गुन्ह्यांची नोंद तर सात गुन्ह्यांत वॉण्टेड आरोपी होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – स्थानिक नगरसेवक आणि शाखा अध्यक्ष असल्याची बतावणी करुन बोलण्यात गुंतवून सोन्याचे दागिने आणि कॅश चोरी करणार्या एका रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी अटक केली. आरोपीविरुद्ध एकूण ६१ गुन्ह्यांची नोंद असून इतर सात गुन्ह्यांत त्याला वॉण्टेड आरोपी दाखविण्यात आले होते. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी ना. म जोशी मार्ग पोलिसांच्या स्वाधीन देण्यात आले असून सध्या तो पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत मुंबईसह आसपासच्या परिसरात स्थानिक नगरसेवक आणि शाखा अध्यक्ष असल्याची बतावणी करुन एका आरोपीकडून स्थानिक रहिवाशांची फसवणुक होत होती. त्यांना बोलण्यात गुंतवून आरोपी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने आणि कॅश चोरी करुन पळून जात होता. १७ नोव्हेंबरला लोअर परेल परिसरात एकाच दिवशी संबंधित आरोपीने नगरसेवक आणि शाखा अध्यक्ष असल्याची बतावणी करुन दोन व्यक्तींची फसवणुक केली होती. त्यांना सोन्याचे दागिने आणि कॅश पिशवीत ठेवण्यास सांगून ती पिशवी हातचलाखीने काढून पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच दोन्ही तक्रारदारांनी ना. म जोशी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी दोन स्वतंत्र फसवणुकीचे गुन्हे दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला होता. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते.
तपासादरम्यान मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक गुन्ह्यांची नोंद झाल्याचे उघडकीस आले होते. प्रत्येक वेळेस आरोपी पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी होत होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी नायगाव येथील नायगाव स्टार सिटी, महालक्ष्मीनगर परिसरातून एका ५६ वर्षांच्या आरोपीस संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. प्राथमिक तपासात आरोपी रेकॉर्डरील सराईत गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्याच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात एकूण ६१ गुन्हे दाखल आहेत. त्याने मुंबईसह रेल्वे हद्दीत तसेच नवी मुंबईत अशाच प्रकारे गुन्हे केले होते.
यातील सात गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. आरोपी मूळचा भिवंडीचा रहिवाशी असून तो वेगवेगळ्या शहरात जाऊन लोकांना बोलण्यात गुंतवून त्यांची फसवणुक करत होता. १७ नोव्हेंबरला त्याने लोअर परेल परिसरात अशाच प्रकारे दोन व्यक्तींची फसवणुक केली होती. त्यामुळे अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी ना. म जोशी मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले होते. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याच्या चौकशीतून अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक गणेश पिसाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश जोष्टे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील काकळीज, पोलीस हवालदार विनोद परब, रविंद्र देसाई, वैभव गिरकर, बिपीन कोचरेकर, वासुदेव परब, हितेश म्हात्रे, पोलीस शिपाई विकास चव्हाण यांनी केली.