सोनसाखळी चोरीनंतर राजस्थानात पळून जाणार्या दुकलीस अटक
सहा गुन्ह्यांची उकल करुन आठ लाखांची सात सोनसाखळी हस्तगत
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – सोनसाखळी चोरीनंतर राजस्थानला पळून जाणार्या एका दुकलीस कुठलाही पुरावा नसताना वांद्रे पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. अटक आरोपीमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्यांच्या अटकेने वांद्रे, विलेपार्ले, अंधैरी, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील सहा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून चोरीचे सात सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केले असून त्याची आठ लाख रुपये इतकी किमंत आहे. आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध सोनसाखळी चोरीसह जबरी चोरी, हत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापतीचे एकूण नऊ गुन्हे असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटकेनंतर एका आरोपीला पोलीस कोठडी तर दुसर्या अल्पवयीन मुलाची डोंगरीतील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
पल्लवी अरविंद वाघेला ही महिला तिच्या पतीसोबत १५ नोव्हेंबरला सायंकाळी पावणेआठ वाजता पायी चालत जात होती. ते दोघेही वांद्रे येथील सेंट सेबिस्टिन रोड, ओलार इमारतीजवळ येताच बाईकवरुन आलेल्या दोनपैकी एका व्यक्तीने पल्लवीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन पलायन केले होते. यावेळी या जोडप्यांनी दोन्ही आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दोघेही बाईकवरुन सुसाट वेगाने पळून गेले होते. घडलेला प्रकार वांद्रे पोलिसांना सांगून तिने दोन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. शहरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश वांद्रे पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर वांद्रे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.
परिससरातील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन गुन्ह्यांतील दोन्ही आरोपी राजस्थानच्या भिलवाडाचे रहिवाशी असल्याचे उघडकीस आले होते. चोरीनंतर ते दोघेही त्यांच्या गावी पळून जात होते. काही दिवस तिथे राहिल्यानंतर ते दोघेही पुन्हा चोरीसाठी मुंबईत येत होते. ही माहिती प्राप्त होताच अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त मोहितकुमार गर्ग, दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अधिकराव पोळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र साळुंखे, पोलीस निरीक्षक अजय लिंगनूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत पालवे, राजेंद्र नागरे, पोलीस हवालदार माने, साबळे, भोगले, गुरव, रकटे, पोलीस शिपाई पवार, सावंत, पाटील आदी पोलीस आरोपींच्या अटकेसाठी राजस्थानला गेले होते.
या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत ते दोघेही रेकॉर्डवरील सोनसाखळी चोरी करणारे गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले. त्यांनी अंधेरी, वांद्रे येथे प्रत्येकी एक, विलेपार्ले येथे तीन तर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात सहा सोनसाखळी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यांतील सुमारे आठ लाखांचे ६५ ग्रॅम वजनाचे सात सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केल्या. त्यांच्याविरुद्ध मुंबईसह राजस्थानात एकूण नऊ गुन्हे दाखल असून त्यात हत्येचा प्रयत्नासह जबरी चोरी, गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.
ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर या दोघांनाही पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. यावेळी एका आरोपीला वांद्रे येथील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी तर दुसर्या अल्पवयीन मुलाला डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले. या गुन्ह्यांचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत पालवे हे करत आहेत.