ड्रग्ज तस्करीप्रकरणी ५१ वर्षाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक
भावाच्या निधनानंतर घरखर्चासाठी पैशांची गरज असल्याचे ड्रग्ज तस्करी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२५ नोव्हेंबर २०२६
मुंबई, – ड्रग्ज तस्करीच्या रामचंद्र बाबूराव हुंबे नावाच्या एका ५१ वर्षांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी सव्वाअकरा लाखांचा हेरॉईनचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रामचंद्रविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह सामूहिक बलात्कारासह इतर पाच ते सहा गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. भावाच्या निधनानंतर घरखर्चासाठी पैशांची गरज असल्याने त्याने र्डग्ज विक्रीला सुरुवात केली होती.
गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांनी ड्रग्ज तस्काराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना अंधेरी परिसरात काहीजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनश्याम नायर, पोलीस निरीक्षक सुनिल करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक उल्हास खोलम, पोलीस हवालदार बाबू येडगे, गौतम बडे, सचिन ठोंबरे, पोलीस शिपाई दिनेश लोखंडे, बिनल शिंगाणे आदी पथकाने अंधेरीतील एमआयडीसी क्रॉस रोड, मेरीगोल्ड हाऊस कंपनीजवळ साध्या वेशात पाळत ठेवलली होती.
सोमवारी रात्री तिथे रामचंद्र र्हुबे आला होता, त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ५६ ग्रॅम वजनाचे हेरॉईन सापडले. त्याची किंमत अकरा लाख वीस हजार रुपये इतकी किमंत आहे. तपासात त्याने तो तिथे हेरॉईन विक्रीसाठी आल्याचे सांगितले. रामचंद्र हा अंधेरीतील सहार रोड, सुबह हॉटेलजवळील महात्मा कबीर नगरात राहतो. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पाच ते सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत तो जेलमध्ये होता.
अलीकडेच तो जेलमधून बाहेर आला होता. त्याच्या भावाचे निधन झाले होते. त्याच्यावर त्याच्या भावाच्या कुटुंबियांची जबाबदारी होती. घरखर्चासाठी पैशांची गरज असल्याने त्याने ड्रग्ज विक्रीला सुरुवात केली होती. त्यासाठी त्याला काही ठरराविक रक्कम कमिशन म्हणून मिळणार होती. त्याच्या चौकशीतून इतर काही आरोपींचे नाव समोर आले आहे, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याला कोर्टाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.