मैत्रिणीसह कुटुंबातील महिलांचे फोटो-व्हिडीओ व्हायरलप्रकरणी आरोपीस अटक

प्रियकराच्या सांगण्यावरुन प्रेयसीनेच फोटो-व्हिडीओ पाठविल्याची कबुली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२ मे २०२४
मुंबई, – प्रियकराला खुश करण्यासाठी प्रेयसीने माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार केल्याचा प्रकार एका घटनेवरुन उघडकीस आला आहे. या प्रेयसीने प्रियकराच्या सांगण्यावरुन तिच्या मैत्रिणीसह स्वतच्याच कुटुंबातील इतर महिलांचे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ व्हॉटअपवर पाठविले. याप्रकरणी मैत्रिणीने घडलेला प्रकार सांगून तरुणीसह तिच्या प्रियकराविरुद्ध सांताक्रुज पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आरोपी प्रियकराला पोलिसांनी अटक केली तर तरुणीची कसून चौकशी केली होती. अटकेनंतर प्रियकराला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीसह त्याच्या प्रेयसीचे मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यात तक्रारदार महिलेसह प्रेयसीच्या कुटुंबातील काही महिलांचे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ सापडले आहे. ते मोबाईल फॉन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने तक्रारदार महिलेसह मुलीच्या कुटुंबियांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

एका खाजगी नर्सिग होममध्ये कामाला असलेली तक्रारदार महिला ही सांताक्रुज येथे राहते. याच ठिकाणी आरोपीची प्रेयसी कामाला असून त्या दोघीही चांगल्या मैत्रिणी आहेत. काही दिवसांपूर्वी तिला ही तरुणी तिच्या मोबाईलवरुन चित्रीकरण करत असल्याचा संशय आला होता, त्यामुळे तिने तिला जाब विचारला असता तिने ती तिच्या प्रियकरासोबत व्हिडीओ कॉलवर संभाषण करत असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन-तीन वेळा असाच प्रकार घडल्याने या महिलेने तरुणीच्या कुटुंबियांना ही माहिती दिली होती. हा प्रकार त्यांनाही संशयास्पद वाटला, अनेकदा ती त्यांच्याससमोर मोबाईलवर चित्रीकरण करत असल्याचे त्यांना संशय होता. त्यामुळे त्यांनी तिच्या नकळत तिच्या मोबाईलची पाहणी केली. यावेळी त्यांना तिच्या मोबाईलमध्ये घरातील काही महिलांसह तक्रारदार महिलेचे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ सापडले. ते फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी तिला जाब विचारला होता. यावेळी तिने या सर्वांचे मोबाईलवरुन तिनेच फोटो आणि व्हिडीओ काढून ते तिच्या प्रियकराला पाठविल्याची कबुली दिली. मोबाईलवरुन फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी त्यानेच तिला प्रवृत्त केले होते. या घटनेनंतर त्यांनी सांताक्रुज पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्या प्रियकराविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी भादवीसह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंद करुन आरोपी प्रियकराला अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या तरुणीसह प्रियकराचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यात या महिलांचे अनेक अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या तरुणीची पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली आहे. तिच्यावर अद्याप कारवाई झाली नसली तरी चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page