महत्त्वाच्या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन
२०६ ठिकाणी कोंबिग ऑपरेशन तर १११ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ मे २०२४
मुंबई, – लोकसभा निवडणुकीनिमित्त महत्त्वाच्या बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तसेच समाजकंटकाकडून शहरात कायदा व सुव्यवस्था प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून शुक्रवारी मुंबई पोलिसांनी अचानक ऑल आऊट ऑपरेशन सुरु केले होते. यावेळी संपूर्ण शहरात २०६ ठिकाणी कोम्बिंग ऑपेशन आणि १११ ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. या कारवाईत २३० आरोपींवर कारवाई केली तर आठ पाहिजे आणि फरारी आरोपींना अटक केली. ७ हजार २३३ वाहनांची तपासणी करण्यात आली. २ हजार ४४० वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत तर ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह मोहीमेतर्ंगत ७७ वाहनचालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नजीकच्या काळात महत्त्वाच्या बंदोबस्तादरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शुक्रवारी रात्री मुंबई पोलिसांनी रात्री अकरा वाजता अचानक ऑल आऊट ऑपरेशन मोहीम सुरु केले होते. रात्री दिड वाजेपर्यंत ते ऑपरेशन सुरु होते. यावेळी पाच प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, तेरा झोनल पोलीस उपायुक्त, ४१ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि सर्वच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी आपल्या हद्दीत विशेष मोहीम हाती घेतली होती. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशदरम्यान विविध ठिकाणी भेट देऊन पोलिसांचे मार्गदर्शन केले. यावेळी पोलिसांकडून २०६ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून ९६४ अभिलेखावरील गुन्हेगार तपासण्यात आले, त्यात पोलिसांना विविध गुन्ह्यांतील २३० तर आठ फरारी आरोपींना अटक करण्यात आली. ५३ जणांवर अजामिनपात्र वॉरंट बजावून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
एनडीपीएस कलमांतर्गत पाच, अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी ४९ जणांवर कारवाई करण्यात आली. या आरोपींकडून चाकूसह तलवारीसारखे घातक शस्त्रे जप्त करण्यात आले. २४ हून अधिक अवैध दारु विक्री-जुगार आदी धंद्यावर कारवाई करुन ते धंदे समूळ उद्धवस्त करण्यात आले. याच गुन्ह्यांत तीस आरोपींना अटक करण्यात आली होती. तडीपारची कारवाई सुरु असताना मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या ६२ तडीपार गुन्हेगारांना अटक करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र-मुंबई पोलीस कायदा कलम १२०, १२२, १३५ आणि १४२ कलमांतर्गत एकूण १७५ जणांवर तर १५४ अनधिकृत फेरीवाल्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. संपूर्ण मुंबई शहरात १११ ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. त्यात ७ हजार २३३ दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी तपासण्यात आले. २ हजार ४४० वाहन चालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत तर ७७ जणांवर ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह कलमांतर्गत कारवाई करण्यात आली. मुंंबई शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणार्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने एकून ८०० हॉटेल, लॉज आणि मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली होती तर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने मर्मस्थळे, संवेदनशील ठिकाणी ५२९ ठिकाणाची तपासणी करण्यात आली होती.