मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ मे २०२४
मुंबई, – चारित्र्यावरुन होणार्या भांडणातून सपना श्रवण राऊत या ३५ वर्षांच्या महिलेची तिच्या पतीने चाकूने वार करुन निर्घृणरीत्या हत्या केल्याची घटना मालाडच्या मालवणी परिसरात घडली. या हत्येनंतर पळून गेलेल्या श्रवण ध्यानी राऊत (४०) याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. श्रवणला सपनाच्या चारित्र्यावर संशयावरुन होता, त्यातून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
ही घटना मालाडच्या मालवणीतील पटेलवाडीत घडली. याच परिसरात श्रवण हा त्याची पत्नी सपना, दोन मुली आणि एक मुलासोबत राहत होता. याच परिसरात श्रवण आणि सपना हे दोघेही भाजी विक्रीचे काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून तो सपनाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात सतत वाद होत होती. दोन दिवसांपासून त्यांच्यातील वाद विकोपास गेले होते. त्यातून त्याने सपनाला बेदम मारहाण केली होती. त्यामुळे तिने श्रवणविरुद्ध मालवणी पोलिसांत अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली होती. या घटनेनंतर श्रवणला पोलिसांनी योग्य ती समज दिली होती. शनिवारी दुपारी पावणेबारा वाजता या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला होता. यावेळी रागाच्या भरात श्रवणने सपनावर बाथरुममध्ये चाकूने वार केले होते. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. हल्ल्यानंतर श्रवण तेथून पळून गेला होता. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या सपनाला कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पत्नीच्या हत्येनंतर श्रवण हा पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र त्याला मालवणी येथून बीट मार्शल आंबेकर, जाधवर यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. चारित्र्याच्या संशयावरुन श्रवणने सपनाची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या हत्येच्या घटनेने मालवणी परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अनैतिक संबंधाच्या वादातून महिलेची हत्या
अनैतिक संबंधाच्या वादातून डोंगरी येथे फुटपाथवर राहणार्या एका ४० वर्षांच्या महिलेची अज्ञात व्यक्तीने बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली. मनिषा असे या महिलेचे नाव असून तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. मनिषा ही डोंगरीतील अंबिका इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरील फुटपाथवर राहत होती. तिला दारुसह नशा करण्याचे व्यसन होते. तिला जो कोणी दारु देत, त्याच्यासोबत ती शारीरिक संबंध ठेवत होती. २९ एप्रिला तिच्या परिचित तरुणाने तिला एका वयोवृद्धासोबत शारीरिक संबंध ठेवल्यावरुन भांडण केले होते. यावेळी तिने तू माझा नवरा नाही, त्यामुळे मला कोणासोबत जायचे आहे, राहायचे आहे किंवा शारीरिक संबंध ठेवायचे आहे ते मी बघून घेईल असे सांगितले. त्याचा राग आल्याने या तरुणाने तिला लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली. तिचे डोक लोखंडी शटरला आपटले. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिला जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपी तरुणाचा शोध सुरु आहे.