मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
४ मे २०२४
मुंबई, – बोरिवली आणि डोंगरीतील दोन अपघातात एका २१ वर्षांच्या बाईकस्वारासह दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाची ओळख पटली नसून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी डोंगरी आणि एमएचबी पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद केली असून एका चालकास अटक केली. दुसरा अपघाताला मृत बाईकस्वार जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
पहिला अपघात बुधवारी १ एप्रिलला रात्री अडीच वाजता बोरिवलीतील न्यू लिंक रोड, प्रमिलानगर ब्रिजख्या बोरिवलीहून दहिसरकडे जाणार्या मार्गिकेवर झाला. प्रियश बबन भिंगारदिवे हा २१ वर्षांचा तरुण मालाडच्या रहेजा अपार्टमेंट, आरबीआय क्वार्टर्स परिसरात राहतो. अर्जुन रोहित वाळा, सोहम विनित अयांगर, कुणाल मेहुल ठक्कर प्रियम मेवाडा, यश रामलाल गौड आणि दिप प्रदीप मिराणी असे त्याचे मित्र असून ३० एप्रिलला ते सर्वजण बाईकने वांद्रे येथे जेवणासाठी गेले होते. बुधवारी रात्री दिड वाजता जेवणानंतर सर्वजण त्यांच्या बाईकवरुन दहिसर येथे आले होते. तिथे काही वेळ टाईमपास केल्यानंतर काहीजण बाईकवरुन फेरफटका मारण्यासाठी निघाले. बाईक चालविताना प्रियशने प्रमिलानगर ब्रिजवरुन बोरिवलीकडून दहिसरच्या दिशेने उलट्या दिशेने बाईक चालविण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो भरवेगात बाईक चालवत होता. कांदरपाडा मेट्रो स्टेशनजवळ येताच समोरुन येणार्या एका कारला प्रियशने जोरात धडक दिली. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. यावेळी प्रियशसह त्याचा मागे बसलेला कुणाल असे दोघेही जखमी झाले होते. त्यामुळे त्यांच्या इतर मित्रांनी त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अर्जुन वाळा याची जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीनंतर पोलिसांनी प्रियशविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्याच मृत्यूस तर मित्र कुणाल ठक्कर याला जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता.
दुसरा अपघात डोंगरीतील चिंचबंदर, केशवजी नाईक रोड, सोमय्या इमारतीसमोर झाला. गुरुनाथ पांडुरंग फडणीस हे वयोवृद्ध गिरगाव येथे राह असून त्यांचा दूध विक्रीचा डोंगरी परिसरात व्यवसाय आहे. त्यांच्याकडे शैलेंद्र श्रीराजकुमार पांडे हा चालक म्हणून काम करतो. मंगळवारी ३० एप्रिलला सकाळी सात वाजता शैलेश हा ट्रक मागे घेत होता. यावेळी त्याने एका व्यक्तीला धडक दिली. चाकाखाली आल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला. त्याला जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघाताची माहिती मिळताच डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुरुनाथ फडणीस यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शैलेंद्र पांडेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.