मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
५ मे २०२४
मुंबई, – शारीरिक संबंधाचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन एका २४ वर्षांच्या तरुणीची बदनामी केल्याचा आरोप असलेल्या हरजोतसिंग सुखदेवसिंग या वॉण्टेड आरोपी तरुणाला दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांनी अटक केली. लैगिंक अत्याचारासह आयटीच्या एका गुन्ह्यांत त्याच्याविरुद्ध पंजाब पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले होते, त्यामुळे दुबई आणि मलेशिया येथून भारतात परत आल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करुन त्याला पुढील चौकशीसाठी पंजाब पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे. वांद्रे येथील लोकल कोर्टाने ट्रॉन्झिंट रिमांड मंजूर केल्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी पंजाब येथे नेण्यात आले आहे. या वृत्ताला काबुली पुतला पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुखविंदर सिंग यांनी दुजोरा दिला आहे.
पिडीत तरुणी आणि आरोपी हरजोतसिंग हे मूळचे पंजाबचे रहिवाशी असून एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. तिच्या मैत्रीचा गैरफायदा घेऊन त्याने तिच्यावर जबदस्तीने लैगिंक अत्याचार केला होता. त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे त्याने मोबाईलवरुन व्हिडीओ काढले होते. हा प्रकार कोणालाही सांगितला तर तिचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी करण्याची धमकीच त्याने तिला दिली होती. त्यामुळे बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नव्हता. तरीही काही दिवसांनी त्याने तिचे अश्लील व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन तिची बदनामी केली होती. हा प्रकार पिडीत मुलीसह तिच्या कुटुंबियांच्या निदर्शनास येताच तिने पंजाबच्या काबुली पुतला पोलीस ठाण्यात हरजोतसिंगविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लैगिंक अत्याचार, जिवे मारण्याची धमकीासह आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होता. मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वीच तो पंजाबहून दुबईला पळून गेला होता.
तपासात तो विदेशात पळून गेल्याचे उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केले होते. दुबई आणि मलेशिया येथे राहिल्यांनतर दोन दिवसांपूर्वी हरजोतसिंग छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याच्याविरुद्ध एलओसी असल्याने त्याला विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला पुढील कारवाईसाठी सहार पोलिसांकडे सोपविण्यात आली. ही माहिती नंतर सहार पोलिसांकडून पंजाब पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर पंजाब पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत आले होते. रविवारी या पथकाने हरजोतसिंगचा ताबा घेतला. त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात ट्रॉन्झिंट रिमांडसाठी हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याची ट्रान्झिंट रिमांड मंजूर केल्यानंतर त्याला सायंकाळी पंजाब येथे पुढील चौकशीसाठी नेण्यात आले.