८६ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेचा आत्महत्येचा प्रयत्नाने खळबळ
बोरिवली पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे महिलेचे प्राण वाचले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ एप्रिल २०२४
मुंबई, – बोरिवली येथे राहणार्या एका ८६ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेने आपल्या राहत्या घरातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. कंट्रोल रुममधून ही माहिती प्राप्त होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत व त्यांच्या पथकाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन प्रसंगावधान दाखवून या महिलेचे प्राण वाचविले. बोरिवली पोलिसांच्या या कामगिरीचे स्थानिक रहिवाशांसह सर्वत्र कौतुक होत आहे. ही वयोवृद्ध सुखरुप असून तिचे समपुदेशन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सोमवारी ६ मे २०२४ रोजी दुपारी साडेबारा वाजता मुंबई पोलिसांच्या मेन कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन बोरिवली परिसरात राहणारी एक वयोवृद्ध महिला इमारतीच्या गॅलरीत बसली असून ती आत्महत्या करण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांच्यासह पोलीस निरीक्षक नागपुरे, मिल स्पेशल संखे व इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेल्यानंतर ही वयोवृद्ध महिला जाळीवर बसल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलीस दुसर्या मजल्यापर्यंत गेले आणि प्रसंगावधान दाखवून या महिलेला घराच्या आत ओढून घेतले. हंसाबेन शहा असे या वयोवृद्ध महिलेचे नाव असून ती तिच्या मुलासह सूनेसोबत बोरिवलीतील मनूभाई ज्वेलर्ससमोरील सह्याद्री इमारतीच्या रुम क्रमांक २३ मध्ये राहते. ती वयोवृद्ध असल्याने वयोमानानुसार आलेल्या आजाराला कंटाळून गेली होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने तिच्या गॅलरीतून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तिचा मुलगा आणि सून कार्यक्रमानिमित्त नाशिक येथे गेले होते. त्यामुळे घरात ती एकटीच होती. या घटनेची माहिती नंतर तिचा मुलगा जयंती शाह याला देण्यात आली. तिचा मुलगा येईपर्यंत तिला शेजारी राहणारी महिला फाल्गुनी रमाने हिच्याकडे सुरक्षित ठेवण्यात आले आहे. मुलगा आल्यानंतर तिला तिच्या मुलाच्या स्वाधीन केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांनी सांगितले. यावेळी हंसाबेनची पोलिसांकडून समपुदेशन करण्यात आले असून तिची मानसिक स्थिती ठिक असल्याचे बोलले जाते.