विदेशात नोकरीच्या आमिषाने २४ बेरोजगार उमेदवारांची फसवणुक

आयेशा प्लेसमेंट कंपनीच्या महिलेसह दोघांना अटक व कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
६ एप्रिल २०२४
मुंबई, – विदेशात विविध पदासाठी नोकरी उपलब्ध असल्याची बतावणी करुन २४ हून अधिक बेरोजगार उमेदवारांकडून १७ लाख ७५ हजार रुपये घेऊन नोकरी न देता त्यांची फसवणुक करणार्‍या आयेशा प्लेसमेंट कंपनीच्या एका महिलेसह दोघांना मालाड पोलिसांनी अटक केली. अनम रेहान अन्सारी ऊर्फ अल्लू ऊर्फ अफसाना आणि शुभम सुंदरलाल तिवारी अशी या दोघांची नावे आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अभिमन्यू सिंह, सतीश पांडेयसह इतर आरोपी फरार असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने दिडशेहून अधिक बेरोजगार तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

विरेंद्र रामआशिष सिंह हे मूळचे उत्तरप्रदेशचे रहिवाशी आहे. गेल्या काही वर्षांपासून ते सौदी अरेबिया, आबुधाबी, कुवैत, दोहा या देशामध्ये रिफायनरी प्लँटमध्ये क्रेन ऑपरेटर म्हणून नोकरी करत होते. कोरोनाची साथ सुरु झाली आणि ते नोकरी सोडून उत्तरप्रदेशात निघून आले. तेव्हापासून ते त्यांच्या गावी शेती करत होते. जानेवारी २०२४ रोजी त्यांना मालाडच्या आयेशा प्लेसमेंट कंपनीकडून विदेशात नोकरीची ऑफर आली होती. विदेशात विविध पदासाठी भरती सुरु असून इच्छुक असल्यास त्यांना अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी कंपनीने सांगितल्याप्रमाणे त्यांचे वैयक्तिक माहिती, कामाचा अनुभवाचे प्रमाणपत्र, मेडीकलचे कागदपत्रे सादर केले होते. यावेळी त्यांना सर्व्हिस चार्जेससह तिकिटाचे ७५ हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी त्यांना ६५ हजार ट्रान्स्फर केले होते. काही दिवसांनी त्यांना मुंबईत बोलाविण्यात आले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांना विमान तिकिटासह नोकरीचे नियुक्तीपत्र, व्हिसा देण्यात आला होता. त्यानंतर त्यांना २ एप्रिलला पुन्हा कार्यालयात येण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे ते मंगळवारी २ एप्रिलला कार्यालयात आले होते. यावेळी तिथे १०० ते १२५ लोक होते. या सर्वांना विदेशात नोकरीचे आमिष दाखविण्यात आले होते. कार्यालयाचे लोखंडी शटर कुलूप लावून बंद होते. चौकशीत त्यांना तिथे इतर २३ उमेदवार सापडले. त्यांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून सर्व्हिस चार्जेस म्हणून सतरा लाख दहा हजार रुपये घेण्यात आले होते. तसेच त्यांना देण्यात आलेले विमान तिकिट, नोकरीचे नियुक्तीपत्र आणि व्हिसा बोगस असल्याचे उघडकीस आले होते.

अशा प्रकारे तिथे उपस्थित २४ जणांकडून कंपनीने १७ लाख ७५ हजार रुपये घेऊन त्यांची नोकरीच्या आमिषाने फसवणुक केली होती. त्यामुळे या २४ जणांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. या सर्वांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली आहे. या जबानीनंतर त्यात अभिमन्यू सिंह, सतीश पांडेय, अनम अन्सारी व अन्य एका महिलेविरुद्ध ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत मालाड पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना अनम ऊर्फ अफसाना आणि शुभम तिवारी या दोघांना पोलिसांनी अटक केली. या कटात त्यांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांनी आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांना विदेशात नोकरीचे आमिष दाखवून गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page