मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
७ एप्रिल २०२४
मुंबई, – उत्तर मुंबईत बाईक चोरी करणार्या एका टोळीचा पर्दाफाश कांदिवली पोलिसांना यश आले. याप्रकरणी एका दुकलीस राजस्थानातून पोलिसांनी अटक केली असून या दोघांकडून पोलिसांनी चोरीच्या अकरा बाईक हस्तगत केल्या आहेत. भेरु नेनू नाथ आणि देवेंद्र कुलदिप सिंह अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे राजस्थानचे रहिवाशी असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी सांगितले. दिवसा आचारीचे काम करुन रात्रीच्या वेळेस ते दोघेही बाईक चोरी करत होते. चोरीच्या बाईकवरुन ते दोघेही गावी शायनिंग मारत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
गेल्या काही दिवसांत उत्तर मुंबईत बाईक चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. दिवसा रेकी करुन रात्रीच्या वेळेस रस्त्यावर पार्क केलेल्या बाईक चोरीस जात असल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सर्वच पोलीस ठाण्यांना अशा बाईक चोरट्याविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांनी त्यांच्या गुन्हे पथकाला तपासाचे आदेश दिले होते. याच दरम्यान एप्रिल महिन्यांत कांदिवलीतील ठाकूर कॉलेजवळ विजय जोखू चौरसिया यांच्या मालकीची एक बाईक चोरी झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच कांदिवली पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरुन या गुन्ह्यांतील काही आरोपी राजस्थानात पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे, पोलीस निरीक्षक आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गिते, पोलीस हवालदार जगदाळे, गावकर, तावडे, पोलीस शिपाई केसरकर, घोडके, राणे यांनी राजस्थानातून भेरु नाथ आणि देवेंद्र सिंह या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत त्यांचा बाईक चोरीच्या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आले. ते दोघेही सराईत बाईक चोर असून त्यांनी अकराहून अधिक बाईक चोरीची कबुली दिली. त्यानंतर या पथकाने राजस्थानातून सहा तर मुंबईतून पाच अशा अकरा चोरीच्या बाईक जप्त केल्या. ते दोघेही आचारी म्हणून काम करत होते. काम करताना रस्त्यावर पार्क केलेल्या बाईकची रेकी करुन रात्रीच्या वेळेस ते दोघेही बाईक चोरी करत होते. चोरी केलेल्या काही बाईक त्यांनी त्यांच्या राजस्थानातील गावी नेले होते. चोरीच्या काही बाईक त्यांनी त्यांच्या भावांना दिली होती. बाईकवरुन फेरफटका मारुन ते दोघेही शायनिंग करत होते. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.