व्यवसायात नुकसान झाल्याने ३.१० कोटीचे कर्ज घेऊन फसवणुक
दोन आरोपींना अटक तर इतर चार आरोपींचा शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
११ मे २०२४
मुंबई, – संयुक्त नावावर असलेल्या घराचे बोगस पॉवर ऑफ ऍटनीसह इतर शासकीय कागदपत्रे तयार करुन बँकेतून तीन कोटी दहा लाखांचे कर्ज घेऊन फसवणुक केल्याच्या कटातील दोन आरोपींना चारकोप पोलिसांनी अटक केली. करण दिलीप ढाबलिया आणि विशाल शिवाभाई परमार अशी या दोघांची नावे असून पोलीस कोठडीनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर चार आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यात तक्रारदाराची पत्नी श्वेता शाम कबाडकर, दर्शन भरतभाई चुडगर, बिना जयंतीलाल रुपारेलिया आणि उमेश लक्ष्मण मंडल यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
५२ वर्षांचे शाम रत्नाकर कबाडकर हे कांदिवलीतील चारकोपचे रहिवाशी असून ते दुबईतील ओएनजीसी शेल्फड्रिलिंगमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करतात. त्यांच्या मालकीचे कांदिवलीतील चारकोप परिसरात दोन फ्लॅट असून ते दोन्ही फ्लॅट त्यांच्यासह त्यांची पत्नी श्वेता यांच्या संयुक्त नावावर आहे. कोरोना काळात श्वेताला तिच्या कपड्याच्या व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे तिची कंपनी बंद पडली होती. तिच्यावर कर्ज होते. या कर्जाची परतफेड करण्यासाठी तिने इतर पाच आरोपींच्या मदतीने त्यांच्या फ्लॅटचे बोगस पॉवर ऑफ ऍटनीसह इतर शासकीय कागदपत्रे तयार करुन त्याचे रजिस्ट्रर नोंदणी केली होती. या कागदपत्रांच्या आधारे तिने एका खाजगी बँकेतून तीन कोटी दहा लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. हा प्रकार अलीकडेच शाम कबाडकर यांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी त्यांच्या पत्नीकडे विचारणा केल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता. त्यासाठी दर्शन, करण, विशाल, बिना आणि उमेश यांनी तिला फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनविण्यास मदत करुन तिला बँकेतून तीन कोटी दहा लाख रुपयांचे कर्ज काढण्यास प्रवृत्त केले. त्यांच्या मदतीने त्यांच्या पत्नीने ही फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार चारकोप पोलिसांना सांगून संंबंधित सहाही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या सहाही आरोपीविरुद्ध चारकोप पोलिसांनी १२० बी, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना करण ढाबलिया आणि विशाल परमार या दोघांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्यांत इतर चोघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.