चौदा विद्यार्थ्यांच्या कोर्सच्या पैशांचा अपहारप्रकरणी जोडप्याला अटक

कोर्ससाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – विविध कोर्ससाठी चौदा विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या सुमारे दहा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याचा आरोप असलेल्या एका जोडप्याला दहिसर पोलिसांनी अटक केली. लक्ष्मण हनुमंत आंधे आणि प्रणिता लक्ष्मण आंधे अशी या दोघांची नावे असून ते दोघेही पती-पत्नी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत राजेश घातड आणि अल्मास मुजावर हे दोघेही सहआरोपी असून त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही विद्यार्थ्यांची फसवणुक केल्याचे बोलले जात असून फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

२२ वर्षांची राधिका शिवनाथ शिंदे ही मिरारोड येथे राहत असून ती सध्या शिक्षण घेते. तिच्या एका मैत्रिणीकडून तिला दहिसर येथील भरुचा रोड, कृष्णा शॉपिंग सेंटरमध्ये नर्सिंग कोर्स चालत असल्याची माहिती समजली होती. त्यामुळे ती जनरल नर्सिंग मिडवायफ्री या कार्यालयात चौकशीसाठी गेली होती. यावेळी तिला कोर्सची फि सत्तर हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तिने तिचे शैक्षणिक आणि इतर कागदपत्रे देऊन प्रवेश घेतला होता. मात्र तीन महिने उलटूनही तिचा प्रवेश झाला आहे की नाही याबाबत काहीच अधिकृत माहिती देण्यात आली नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने संबंधित इन्स्टिट्यटूटची माहिती काढली. यावेळी तिला प्रणिता आंधे आणि राजेश घाटड यांच्या नावाने ते इन्स्टिट्यूट रजिस्ट्रर असल्याचे समजले. लक्ष्मण हा प्रणिताचा पती असून त्याच्यासह अल्मास हिने तिच्यासह इतर विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी पैसे घेतले होते. जानेवारी २०२४ रोजी तिच्यासह मुंबई आणि ठाण्यातील पंधरा विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी बंगलोर येथे नेण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत लक्ष्मण, दुर्गेश आणि अल्मास मॅडम उपस्थित होते. मात्र तिथे कोणाचीही परिक्षा घेण्यात आली नाही. वेगवेगळे कारण सांगून परिक्षा रद्द झाल्याचे सांगून या सर्वांना पुन्हा मुंबईत आणण्यात आले. त्यानंतर त्यांना फे्रबुवारी किंवा एप्रिल महिन्यांत परिक्षा होईल असे सांगितले. मात्र त्यांची परिक्षा झाली नाही. काही दिवसांनी लक्ष्मणने परिक्षा झाली नाहीतर तिला पावणेतीन लाख रुपये परत करण्याचे आश्‍वासन दिले, मात्र दिलेल्या मुदतीत त्याने प्रवेशाच्या वेळेस घेतलेले पैसे परत केले नाही.

अशा प्रकारे या चौघांनी विविध कोर्ससाठी प्रवेश देण्याचे आमिष दाखवून पंधरा चौदा विद्यार्थ्यांकडून दहा लाख सात हजार रुपये घेऊन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने दहिसर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चारही आरोपीविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना लक्ष्मणसह त्याची पत्नी प्रणिती या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. इतर दोन आरोपी पळून गेल्याने त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page