मतदानासाठी जाणार्या वयोवृद्धाचा बेस्ट बस अपघातात मृत्यू
मुलुंड येथील दुसर्या अपघातात अज्ञात व्यक्तीचा मृत्यू
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मे २०२४
मुंबई, – लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जाणार्या सुरेश भास्कर कुलकर्णी या ६५ वर्षांच्या वयोवृद्धाचा बेस्ट बसच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना कुर्ला परिसरात घडली. सुरेश हे मंत्रालयातून शिपाई म्हणून निवृत्त झाले असून सोमवारी ते मतदानासाठी घरातून सहा वाजता बाहेर पडले होते, मात्र मतदान केंद्राच्या दिशेने जाताना त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती. याप्रकरणी नेहरुनगर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन आरोपी बेस्ट बसचा चालक साहेबराव नारायण नवले याला अटक केली. मात्र हा गुन्हा जामिनपात्र असल्याने नंतर त्याची जामिनावर सुटका करणयात आली.
हा अपघात सोमवारी सकाळी सव्वाआठ वाजता कुर्ला येथील नेहरुनगर, शिवसृष्टी, स्वामी विवेकानंद शाळेसमोर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वप्निल सुरेश कुलकर्णी हा तरुण खारघर, शिवाजी चौकात त्याचे वडिल सुरेश, आई सविता आणि लहान भाऊ सौरभ याच्यासोबत राहतो. तो डी मार्ट येथे सेल्स असोशियन म्हणून नोकरी करतो तर त्याचे वडिल सुरेश हे मंत्रालयातून शिपाई म्हणून निवृत्त झाले आहे. त्यांना सध्या पेंशन मिळत होते. खारघर येथे शिफ्ट होण्यापूर्वी ते सर्वजण कुर्ला येथे राहत होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सुरेश कुलकर्णी हे सकाळी सहा वाजताच घरातून निघाले होते. स्वामी विवेकानंद शाळेत असलेल्या मतदान केंद्राच्या दिशेने रस्ता क्रॉस करताना त्यांना एका बेस्ट बसने धडक दिली होती. त्यात त्यांच्या डोक्याला, नाका-तोंडाला, कानाला आणि खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच नेहरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्या सुरेश यांना जवळच्या भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी स्वप्निल कुलकर्णी याच्या तक्रार अर्जावरुन नेहरुनगर पोलिसांनी बसचालक साहेबराव नवले याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने बस चालवून एका वयोवृद्धाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली.
दुसरा अपघात मंगळवारी सकाळी सहा ते सव्वासहाच्या सुमारास मुलुंड येथील नवघर फ्लायओव्हर ब्रिजवरील उत्तर वाहिनीवर झाला. ब्रिजच्या उत्तर वाहिनीवरुन जाणार्या एका व्यक्तीला भरवेगात जाणार्या व्यक्तीने धडक दिली होती. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्याची ओळख पटली नसून त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अपघातानंतर वाहनचालक पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.