लग्नासाठी हनी ट्रप लावून खंडणीचा प्रकार उघड

शिवडीतील घटना; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२४ मे २०२४
मुंबई, – लग्नासाठी हनी ट्रप लावून खंडणी उकाळणार्‍या सहाजणांविरुद्ध रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत् गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक फायद्यासाठी या टोळीने एका तरुणाचे एका महिलेशी लग्न लावून त्याचे मानसिक व शारीरिक शोषण करुन खोटी केस दाखल करुन खंडणी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चंदा खाला, नाजिया फईम, फईम, तरन्नूमजहॉं मोहम्मद रिझवान, म्हैसरजहॉं आणि फारुख शब्बीर अहमद अशी या सहाजणांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

मैसरजहॉं फकीरा मोहम्मद शेख ही ६६ वर्षांची वयोवृद्ध महिला शिवडी क्रॉस रोड, पठाण मशिदीजवळील बीएमसी चाळीत राहते. तरन्नूमजहॉं ही मैसरजहॉंच्या मुलाची पत्नी असून चंदा खाला ही हनी ट्रॅपद्वारे फसवणुकीचे गुन्हे करते. ती लग्न जुळविण्याची एजंट म्हणून काम असल्याचे सांगून लोकांकडून पैसे उकाळते. इतर आरोपी तिचे नातेवाईक आहेत. दोन वर्षांपूर्वी मैसरजहॉं ही तिचा मुलगा रिझवानच्या लग्नासाठी स्थळ शोधत होती. यावेळी चंदाने तिला तरन्नूमजहॉं हिचे स्थळ सुचविले होते. ती उत्तरप्रदेशची रहिवाशी असून ती तिच्या मुलाचा संसार सुखाने करुन देईल असे आश्‍वासन दिले होते. या लग्नासाठी तिने तिच्याकडून ऐंशी हजार कमिशन म्हणून घेतले होते. जून २०२२ रोजी लग्नाची तारीख ठरली असताना तिने त्यापूर्वीच रिझवान आणि तरन्नूमजहॉं यांचा घरात विवाह घडवून आणला होता. याच दरम्यान रिझवानने तरन्नूमजहॉंची माहिती काढली असता ती २८ वर्षांची नसून ४० वर्षांची असल्याचे समजले. लग्नाच्या वेळेस तिने वयाचा कुठलाही पुरावा किंवा आधारकार्ड दिला नव्हता. याबाबत विचारणा केल्यांनतर चंदासह तरनूमजहॉं त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. लग्नानंतर काही दिवसांत तरन्नूमजहॉं ही घरात दादागिरी करु लागली. शिवीगाळ करुन सर्वांवर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होती. याच दरम्यान तिने ती ४० वर्षांची असल्याची कबुली दिली होती. रिझवानसोबत माझे लग्न झाले असून तुम्ही आता तिचे काहीही वाकडे करु शकत नाही. मी टाईमपास म्हणून लग्न केले असून तुम्ही माझे नोकर आहेत. संसारात मला रस नाही असे सांगून ती घरातील कॅश, दागिने आणि महागडे वस्तू चोरी करु लागली.

ऑक्टोंबर २०२२ रोजी मैसरजहॉंने तरन्नूमजहॉला कपाटातून पैसे चोरी करताना रंगेहाथ पकडले होते. यावेळी तिने तिला बेदम मारहण केली होती. त्यानंतर ती चंदाखालासोबत उत्तरप्रदेशात पळून गेली होती. तिथे गेल्यानंतर तिने इतर नातेवाईकांना हाताशी धरुन, त्यांना पैशांचे आमिष दाखवून रिझवानविरुद्ध उत्तरप्रदेशातील लोकल कोर्टात खोटी केस दाखल केली होती. या केसमुळे रिझवानची प्रचंड बदनामी झाली होती. त्यामुळे मैसरजहॉंने तिची समजूत काढून केस मागे घेण्याची विनंती केली. त्यासाठी या टोळीने तिला ब्लॅकमेल करुन तिच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. याच दरम्यान तिने तिला तीन लाख रुपये होते. यावेळी साक्षीदार म्हणून इतर आरोपी तिथे उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी एका करारावर स्वाक्षरी केली होती. या घटनेनंतर संंबंधित सहाजण रिझवानला जिवे मारण्याची धमकी देत तिच्याकडे सतत पैशांची मागणी करत होते. चौकशीनंतर या सहाजणांनी कट रचून रिझवानशी पैशांसाठी लग्न केल्याचे उघडकीस आले. त्यांची आर्थिक फसवणुक करण्याच्या उद्देशाने त्यांनी कोर्टात खोटी केस करुन त्याला उत्तरप्रदेशात नेले. तिथे त्याचा प्रचंड मानसिक व शारीरिक शोषण करुन, ब्लॅकमेल करुन त्याच्याकडून पैशांची मागणी केली. सुमारे अकरा लाखांची खंडणी उकाळूनही त्यांच्याकडून रिझवानला जिवे मारण्याची धमकी दिली जात होती.

सततच्या ब्लॅकमेल आणि खंडणीसाठी येणार्‍या धमक्यांना कंटाळून मैसरजहॉने शिवडी कोर्टात याचिका दाखल करुन संबंधित सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी देताना कोर्टाने रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांना सहाही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर चंदा खाला, नाजिया फईम, फईम, तरन्नूमजहॉं मोहम्मद रिझवान, म्हैसरजहॉं आणि फारुख शब्बीर अहमद यांच्याविरुद्ध पोलिसांनी १२० बी, ३८४, ३८५, ४२० ४०६, ४१९, ५००, ५०६ (२), ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही टोळी आर्थिक फायद्यासाठी हनी ट्रॅपद्वारे लग्न लावून पतीसह त्यांच्या कुटुंबियांवर विविध आरोप करुन त्यांना ब्लॅकमेल करुन खंडणी वसुली करत होते. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page