भरवेगात बाईक चालविण्याच्या प्रयत्नात बाईकस्वाराचा मृत्यू

चेंबूर येथील अपघात; मृत बाईकस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मे २०२४
मुंबई, – भरवेगात बाईक चालविण्याच्या प्रयत्नात एका बाईकस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना चेंबूर परिसरात उघडकीस आली. आकाश नामदेव मुंडे असे या मृत बाईकस्वाराचे नाव असून आरसीएफ पोलिसांनी आकाशविरुद्ध स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. आकाशच्या अपघाती मृत्यूने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली आहे.

हा अपघात शुक्रवारी रात्री उशिरा बारा वाजता चेंबूर येथील एचपीसीएल क्वॉटर्स गेटसमोरील शंकर देऊळ कॉलनीकडे जाणार्‍या वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आकाश हा चेंबूर येथे राहत होता. शुक्रवारी रात्री तो त्याच्या बाईकवरुन घराच्या दिशेने जात होता. रात्रीची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे त्याने बाईक भरवेगात पळविण्याचा प्रयत्न केला, त्यात त्याचे बाईकवरील नियंत्रण सुटले आणि त्याची बाईक स्लीप होऊन बाईकने एका लोखंडी पाईपला जोरात धडक दिली होती. या अपघातात आकाश हा गंभीररीत्या जखमी झाला होता. मुख्य नियंत्रण कक्षातून अपघाताची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी गेलेल्या पोलिसांनी त्याला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याच दरम्यान त्याच्या मोबाईलवर एक फोन आला होता. तो फोन त्याचे वडिल नामदेव मुंडे यांचा होता. अपघाताची माहिती मिळताच नामदेव हे त्यांची उषा मुंडे यांच्यासोबत राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेले होते. घडलेला प्रकार नंतर त्यांना पोलिसांकडून समजला. भरवेगात बाईक चालविण्याचा प्रयत्नात हा अपघात झाला होता. त्यामुळे आकाशविरुद्ध पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page