फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहारप्रकरणी आरोपीस अटक
पळून गेलेल्या इतर तिघांचा पोलिसांकडून शोध सुरु
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ मे २०२४
मुंबई, – फ्लॅटच्या बहाण्याने एका फुल विक्रेत्याची सुमारे २० लाखांची फसवणुक करुन पळून गेलेल्या आरोपीस मालाड पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जावेद अन्सारी असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्याचे तीन सहकारी प्रशांत मधुसुदन गिरणीकर ऊर्फ विशाल किशोर तोंडपे, राजेश जाधव ऊर्फ योगेश चंदूलाल कमानी आणि आसिफ मकसूद खान हे पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांची समान वाटणी करुन या चौघांनी ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
शिवकुमार रामनाथ गुप्ता हा फुल विक्रेता असून ते त्याच्या कुटुंबियांसोबत जोगेश्वरी येथे राहतात. त्यांना त्यांच्या कुटुंबियासाठी एक फ्लॅट घ्यायचा होता. गेल्या वर्षी जून महिन्यांत ते मालाड येथील येथील एका मॉलमध्ये गेले होते. तिथे त्यांना राजेश जाधव याच्या हॅप्पी होम्स नावाच्या प्रॉपटी डिलर कार्यालयाची जाहिरात दिसली होती. त्यामुळे ते कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी राजेशला अंधेरी येथे एक फ्लॅट घ्यायचा आहे असे सांगितले. राजेशने त्यांना त्यांचा बजेट विचारुन अंधेरी येथे चार फ्लॅट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगून एका फ्लॅटमालकाला तातडीने पैशांची गरज आहे. त्यामुळे तुम्हाला तो फ्लॅट स्वस्तात मिळवून देतो असे सांगितले होते. त्यामुळे ते त्याच्यासोबत अंधेरीला फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते. अंधेरीतील डी. एन नगर, स्विसहाईट टॉवरमध्ये आणल्यानंतर त्याने त्यांना विसाव्या मजल्यावरील २००१ क्रमांकाचा फ्लॅट दाखविला होता. हा फ्लॅट त्यांना आवडला होता. त्यामुळे तोच फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. चर्चेअंती त्यांच्यात ८५ लाखांमध्ये फ्लॅटचा खरेदी-विक्रीचा सौदा झाला होता. त्यापैकी २० लाख रुपये त्यांनी त्याच्या मालाड येथील कार्यालयात दिले होते. यावेळी तिथे प्रशांत गिरणीकर नावाचा एक व्यक्ती होता. तो फ्लॅट त्याच्या मालकीचा असल्याने त्याने सांगितले होते. इतर दोघांमध्ये आसिफ खान आणि जावेद अन्सारी यांचा समावेश होता. ते दोघेही त्याचे पार्टनर असल्याचे सांगून त्याने त्यांची ओळख करुन दिली होती. २० लाखांचे पेमेंट झाल्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र एक आठवडा होऊन राजेशने फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करुन दिले नव्हते. तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ते त्याच्या मालाड येथील कार्यालयात गेले होते. तिथे गेल्यानंतर त्यांना कार्यालय बंद असल्याचे दिसून आले.
ऑगस्ट २०२३ रोजी त्यांना राजेश भेटला, तो त्याचे कार्यालय दुसर्या ठिकाणी शिफ्ट करत होता. त्याला फ्लॅटसह पैशांबाबत विचारणा केल्यानंतर त्याने त्यांनी दिलेले २० लाख रुपये आम्ही चौघांनी आपसांत वाटून घेतले आहे. त्यामुळे त्यांना फ्लॅट मिळणार नाही आणि फ्लॅटसाठी दिलेले पैसे परत करणार नाही असे सांगून त्याने निघून जाण्यास सांगितले. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच शिवकुमार गुप्ता यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर बोगस फ्लॅटमालक प्रशांत गिरणीकर, प्रॉपटी डिलर राजेश जाधव, त्याचे पार्टनर आसिफ खान आणि जावेद अन्सारी यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते सर्वजण पळून गेले होते. त्यापैकी मोहम्मद जावेदला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याच्यासह त्याच्या इतर तिघांनी ही फसवणुक केल्याची कबुली दिली आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फ्लॅटच्या नावाने फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.