सायगर गुन्हेगारांना बॅक खाती पुरविणार्या टोळीचा पर्दाफाश
पार्टटाईम जॉबसह गुंतवणुकीच्या नावाने अनेकाना गंडा
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
३१ मे २०२४
मुंबई, – ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर गुन्हेगारांना विविध बँकेत बँक खाती पुरविणार्या एका टोळीचा दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. हिमांशू रविंद्र मोरे आणि प्रेम दादाजी शेवाळे अशी या दोघांची नावे असून ते दोघेही नाशिकच्या मालेगावचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी विविध बँकेचे २९ डेबीट कार्ड, २८ बँकेचे पासबुक, वेलकम किट लेटर, वेगवेगळ्या कंपनीचे आठ सिमकार्ड आणि आठ मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने आतापर्यंत पार्टटाईम जॉबसह गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून अनेकांना गंडा घातला आहे. ठराविक कमिशनसाठी बोगस बँक खाते उघडण्यास त्यांना एका हॉटेलच्या वेटरने सांगितले होते, या दोघांना अटकेनंतर तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांनी सांगितले.
यातील तक्रारदार महिला कुलाबा येथे राहते. काही दिवसांपूर्वी तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन पार्टटाईम जॉबची ऑफर दिली होती. या जॉबच्या नावाने या ठगाने तिची १४ लाख २३ हजाराची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच २ मेला तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला होता. तिच्या तक्रारीवरुन सायबर सेल पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, १२० बी, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त आबूराव सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक दिपक देसले, पोलीस हवालदार सचिन धोत्रे, मधुकर लहारे, पोलीस शिपाई नितीन शिंदे यांनी तपासाला सुरुवात केली होती. तपासात फसवणुक करणारी करणारी ही टोळी नाशिक येथे कार्यरत असल्याचे उघडकीस आले. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, ते बँक ाते नाशिकच्या हॉटेलमध्ये काम करणार्या कर्मचार्यांच्या नावाने उघडण्यात आले होते. या कटातील मुख्य आरोपी आरोपी हादेखील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. त्यानेच इतर हॉटेल कर्मचारी, त्यांच्या मित्रांना हाताशी धरुन त्यांच्या नावाने बँकेत बँक खाती उघडली होती. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर गुन्हेगार याच बँक खात्याचा वापर करत होते. बँकेत जमा होणारी रक्कम एटीएममधून काढून आरोपी वेटर अमेरिकन डॉलर खरेदी करुन ते विदेशात वास्तव्यास असलेल्या मुख्य आरोपींना पाठवत होता. बँक खाती उघडण्यासाठी संबंधितांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून दिली जात होती. अशा प्रकारे या वेटर आरोपीने आतापर्यंत विविध बँकेत खाती उघडल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
हिमांशू मोरे आणि प्रेम शेवाळे यांनीही त्याच्याच सांगण्यावरुन बँकेत खाते उघडून दिले होते. त्यांच्याच खात्यात तक्रारदार महिलेने पैसे ट्रान्स्फर केले होते. या बँक खात्याची माहिती काढल्यानंतर या दोघांचे नावे समोर आली होती. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांना अटक करुन पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. ते दोघेही नाशिकच्या मालेगावचे रहिवाशी असून सध्या पीएनटी कॉलनीत राहत होते. या दोघांकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात डेबीट कार्ड, पासबुक, मोबाईल आणि सिमकार्ड जप्त केला आहे. पार्टटाईम जॉबसह गुंतवणुकीवर चांगला परवाता देतो असे सांगून या टोळीने आतापर्यंत अनेकांना गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे सायबर पोलिसांनी अशा भुलथापांना बळी पडू नये. ऑनलाईन फसवणुक झाल्यास १९३० क्रमांकावर तात्काळ तक्रार करावी असे आवाहन केले आहे. दुसरीकडे सायबर गुन्हेगारांना खाती पुरविणार्या टोळीचा पर्दाफाश करुन या कटातील दोन आरोपींना अटक करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचार्यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले. या कटातील पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.