अनैतिक संबंधातून झालेल्या महिलेच्या हत्येचा पर्दाफाश
हत्येनंतर पुरावा नष्ट करणार्या नातेवाईक तरुणाला अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१ जून २०२४
विरार, – नालासोपारा येथे एका अज्ञात महिलेचा हत्येचा पर्दाफाश करण्यात पेल्हार पोलिसांना यश आले असून अवघ्या ७२ तासांत हत्येतील नातेवाईक असलेल्या आरोपी तरुणाला दिल्लीतून पोलिसांनी अटक केली. नजाबुद्दीन मोहम्मद सम्मी असे या आरोपीचे नाव असून हत्येनंतर तो दिल्लीला पळून गेला. अनैतिक संबंधातून झालेल्या वादातून ही हत्या झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी यांनी सांगितले.
२८ मेला सकाळी नऊ वाजता नालासोपारा येथील धानिवबाग, ओव्हळात हरवटेपाडा परिसरात एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पेल्हार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिथे पोलिसांना एका ३५ ते ४० वयोगटातील महिलेचा मृतदेह दिसून आला. तिच्या मानेवर, छातीवर तिक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. तिची हत्या करुन मृतदेह धोदाडा डोंगराच्या खाली फेंकून मारेकर्याने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. मृत महिलेची ओळख पटली नव्हती. त्यामुळे तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. याप्रकरणी दिलीप रामचंद्र हरवटे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या हत्येची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी यांना आरोपीच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त जयंत बळबळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमारगौरव धावड, शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम भोपळे, सहाय्यक फौजदार सुरेंद्र शिवदे, बाळासाहेब घुटाळ, पोलीस हवालदार योगेश देशमुख, तानाजी चव्हाण, अनिल शेगर, वाल्मिक पाटील, अंमलदार रवि वानखेडे, मिथुन मोहिते, संयज मासाळ, किरण आव्हाड, राहुल कर्पे, अभिजीतनेवारे, निखील मंडलिक, दिलदार शेख, अनिल साबळे, शरद राठोड, पोलीस हवालदार नामदेव ढोणे, अंमलदार सोहेल शेख यांनी तपास सुरु केला होता.
महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले असतानाच धानीवबाग तलाव परिसरात जियाउल्लाह म्हातावू शाह हा त्याच्या दोन मुलांसोबत राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याची पत्नी सायरा बानू ही गेल्या तीन दिवसांपासून मिसिंग असल्याचे समजले. हत्या झालेल्या महिलेचा फोटो दाखविल्यानंतर त्याने तो फोटो तिच्याच पत्नीचा असल्याचे ओळखले. त्यानंतर त्यांना सीसीटिव्ही फुटेज दाखविले असता फुटेजमध्ये दिसणारा तरुण नजाबुद्दीन हा त्यांचा भाचा असल्याचे सांगितले. तो दिल्लीतील एका बेकरीत काम करत होता. मारेकर्याची ओळख पटल्यानंतर पेल्हार पोलिसांचे एक पथक दिल्लीत गेले होते. या पथकाने शंभरहून अधिक बेकरीमध्ये त्याचा शोध घेतला, अखेर एका बेकरीत काम करताना नजाबुद्दीलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच सायराबानूची हत्या केल्याची कबुली दिली. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यात अनैतिक संबंध होते. गेल्या काही दिवसांपासून याच संबंधातून त्यांच्यात सतत खटके उडत होते. त्यामुळे त्याने तिची हत्या करण्याची योजना बनविली होती. ठरल्याप्रमाणे त्याने तिला भेटायला बोलाविले होते. २७ मेला साडेबारा वाजता ती तिथे गेल्यानंतर नजाबुद्दीनने सायराबानूची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केली. तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावून तो दिल्लीला पळून गेला होता.
कंडोमच्या पाकिटावरुन आरोपीची ओळख पटली
सायराच्या मृतदेहाजवळ पोलिसांना कंडोम सापडले होते. ते कंडोम मारेकर्याचे असावे आणि त्याने ते जवळच्या मेडीकल स्टोअरमधून विकत घेतले असावे अशी शक्यता व्यक्त करुन पोलिसांनी परिसरातील मेडीकल स्टोअरमध्ये चौकशी सुरु केली होती. ही चौकशी सुरु असताना एका मेडीकल स्टोअरमध्ये मारेकर्याने ते कंडोम पॅकेट विकत घेतल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या दुकानाचे सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी प्राप्त केले. त्यात हा मारेकरी दिसत होता. जियाउल्लाहने मृतदेह तिच्या पत्नीचा असल्याचे ओळखल्यानंतर त्याला सीसीटिव्ही फुटेजमधील तरुणाचा फोटो दाखविण्यात आला. तो फोटो त्याने भाचा नजाबुद्दीन सम्मी याचा असल्याचे सांगितले. नजाबुद्दीन हा मूळचा उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थनगरचा रहिवाशी असून सध्या दिल्लीतील एका बेकरीमध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एक टिम दिल्लीला गेली आणि काही तासांत नजाबुद्दीनला ताब्यात घेतले आणि या हत्येचा अवघ्या ७२ तासांत पोलिसांनी पर्दाफाश केला. एका कंडोमवरुन मारेकर्याची ओळख पटल्याचे पोलिसांनी सागितले. अज्ञात महिलेच्या हत्येचा अवघ्या ७२ तासांत पर्दाफाश करुन या कटातील मुख्य आरोपीला जेरबंद करणार्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र व्हनकोटी यांच्यासह त्यांच्या पथकाचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे.