३ कोटी ३७ लाखांच्या एमडीसह नायजेरीयन नागरिकाला अटक

जेडब्ल्यू मेरीएट हॉटेलजवळ जुहू एटीएसची कारवाई

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका नायजेरीयन नागरिकाला गुरुवारी जुहू एटीएसच्या अधिकार्‍यांनी जेडब्ल्यू मेरीएट हॉटेल परिसरातून अटक केली. इगवे जॉन असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी २ किलो २५० ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या ड्रग्जची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ३ कोटी ३७ लाख रुपये इतकी आहेत. त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
जुहू येथील जुहू तारा रोड, जे. डब्ल्यू मेरीएट हॉटेलजवळ काही नायजेरीयन नागरिक येणार आहे. त्यांच्या कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा असून या एमडी ड्रग्जची देवाणघेवाण होणार असल्याची माहिती जुहू एटीएसला मिळाली होती. या माहितीनंतर गुरुवारी पोलिसांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री उशिरा तिथे इगवे जॉन आला होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना दोन किलो एमडी ड्रग्ज सापडले. एटीएस कार्यालयात आणून चौकशी केली असता त्याला ते ड्रग्ज नालासोपारा येथे राहणार्‍या त्याच्या एका मित्राने दिल्याचे उघडकीस आले. त्यानंतर या पथकाने त्याच्या मित्राच्या नालासोपारा येथील घरी छापा टाकला होता. त्याचा मित्र तिथे पोलीस जाण्यापूर्वीच पळून गेला होता. मात्र त्याच्या घरातून पोलिसांनी २५० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी २ किलो २५० एमडी जप्त केले असून त्याची किंमत ३ कोटी ३७ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. याच गुन्ह्यांत नंतर इगवेला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला शुक्रवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. इगवे हा नायजेरीयन नागरिक असून सध्या नालासोपारा येथे राहतो. तपासात संबंधित आरोपी भारतात आल्यानंतर त्यांचा व्हिसा आणि पासपोर्ट नष्ट करतात किंवा त्यात फेरफार करुन ते वापरतात. त्यामुळे त्यांचा पूर्वइतिहास आणि गुन्हेगारी पार्श्‍वभूमी पोलिसांच्या निदर्शनास येत नाही. त्याच्या आधारे ते घर भाड्याने घेतात आणि तेथून आपला बेकायदेशीर व्यवसाय करत असल्याचे उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page