मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ एप्रिल २०२४
मुंबई, – दहिसर येथे सुरु असलेल्या एका सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन वेश्यादलाल महिलांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरुद्ध भादवीसह पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अमरिन अनिस शेख आणि रेश्मा बेगम सरदार खान अशी या दोघींची नावे असून या दोघींनाही नंतर पुढील चौकशीसाठी दहिसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. अटकेनंतर या दोघींनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी सात तरुणींची सुटका केली असून त्यात दोन अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. त्यांना कांदिवलतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
दहिसर येथे काही महिला सेक्स रॅकेट चालवत असून काही अल्पवयीन मुलीसह तरुणींना ग्राहकांसोबत विविध लॉज, हॉटेल आणि गेस्टमध्ये शारीरिक संबंधासाठी पाठवत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या मदतीने संबंधित महिलांना संपर्क साधून त्यांच्याकडे काही तरुणींची मागणी केली होती. फोनवरच त्यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. त्यानंतर बोगस ग्राहकांना त्यांना तरुणींना घेऊन दहिसर येथे बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे मंगळवारी सायंकाळी अमरिन आणि रेश्मा या दोघीही सात तरुणीसोबत दहिसर येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोकुळ आनंद व्हेज रेस्ट्रॉरंटजवळ आले होते. यावेळी या दोघींसह बोगस ग्राहकांसोबत आर्थिक व्यवहार सुरु असताना तिथे पोलिसांनी छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलीसह पाच तरुणींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन या दोन्ही महिलांना त्यांना शारीरिक संबंधासाठी विविध ग्राहकांसोबत पाठवत असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दोन्ही मुलीसह पाचही तरुणींची पोलिसांनी सुटका करुन त्यांना मेडीकलसाठी पाठविण्यात आले होते. मेडीकलनंतर या सर्वांना कांदिवलीतील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले.
याप्रकरणी अमरिन आणि रेश्मा यांच्याविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात ३६६ (अ), ३६६ (ब), ३७० (अ), (१), ३७० (३), (५) भादवी सहकलम ४, ५, १६, १७, १८ स्त्रिया आणि मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच या दोघींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बुधवारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.