अपघातात जखमी वयोवृद्ध महिलेस रस्त्यावर टाकून पळून गेलेल्या रिक्षाचालकास अटक
बाईकने धडक देणार्या तरुणाचीही ओळख पटली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ जून २०२४
मुंबई, – अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या लक्ष्मी कमला सायनी या ७५ वर्षांच्या वयोवृद्ध महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल न करता तिला भिवंडीतील रस्त्यावर टाकून अपघाताचा पुरावा नष्ट केल्याचा आरोप असलेल्या राहुलकुमार साहू नावाच्या रिक्षाचालकास अखेर एमएचबी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान ज्या बाईकने लक्ष्मी यांना धडक दिली होती, त्या बाईकस्वार तरुणाची ओळख पटली आहे. तो दहिसर येथे राहत असून अपघाताच्या दिवशी आई-वडिलांना जेवण आणण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्या बाईकने लक्ष्मीला धडक दिली होती. त्यात तिचा मृत्यू झाला होता. या अपघातात तो स्वत जखमी झाला होता. त्यामुळे त्याच्यावर उपचार सुरु असून तो बेशुद्धावस्थेत आहे. उपचारानंतर त्याच्यावर अटक्ेची कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
गणेश माणिक जांबुळे हा बोरिवलीतील शिंपोली परिसरात राहत असून मृत लक्ष्मी ही त्याची आजी आहे. ३० मेला सकाळी ती घराबाहेर निघून गेली. रात्री उशिरापर्यंत ती घरी आली नाही. त्यामुळे गणेशसह त्याच्या कुटुंबियांनी लक्ष्मी यांचा शोध घेतला. नातेवाईकांकडे विचारपूस केली. मात्र त्यांना कुठेच लक्ष्मी सापडल्या नाही. त्यामुळे त्यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तिची मिसिंगची तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना दहिसर ब्रिज रात्री अकरा वाजता एक अपघात झाल्याची माहिती पोलिसांना समजली होती. अज्ञात बाईकस्वाराने एका वयोवृद्ध महिलेला धडक दिली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. अपघातानंतर बाईकस्वार पळून गेला होात. जखमी झालेल्या महिलेला लोकांनी एका रिक्षात बसविले आणि रिक्षाचालकाला तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन विनंती केली होती. त्यानंतर रिक्षाचालक तेथून निघून गेला होता. या माहितीनंतर गणेशसह त्याच्या नातेवाईकांनी परिसरातील सर्व हॉस्पिटलमध्ये लक्ष्मीचा शोध घेतला, मात्र ती कुठेच सापडली नाही. दुसर्या दिवशी बोरिवली पेालिसांनी गणेशला फोन करुन नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे शिलोत्तर, कामण-भिवंडी रोडवर एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सापडला आहे. तिचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ते सर्वजण तिथे गेले होते. मृत महिलेचा मृतदेह पाहिल्यानंतर तो मृतदेह त्याच्याच आजीचाच असल्याचे त्याने ओळखले. तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. ओळख पटल्यानंतर लक्ष्मीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. लक्ष्मी हिला एका अज्ञात बाईकस्वाराने धडक दिल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिला वेळीच हॉस्पिटलमध्ये दाखल न करता रिक्षाचालकाने तिला कामण-भिवंडी रोडवर आणून रस्त्यावरुन तिला टाकून पलायन केले. त्यात तिचा मृत्यू झाला होता. त्याने अपघाताचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करुन घटनास्थळाहून पलायन केले.
हा प्रकार उघडकीस येताच लक्ष्मीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या बाईकस्वारासह तिचा मृतदेह भिवंडी येथे नेऊन अपघाताचा पुरावा नष्ट करणार्या रिक्षाचालक अशा दोघांविरुद्ध एमएचबी पोलिसांनी २७९, ३०४ अ, ३३७, ३३८, २०१ भादवी सहकलम १८४, १८७ मोटार वाहन अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजवरुन आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना राहुलकुमार साहू या रिक्षाचालकास अटक केली. चौकशीत अपघाताच्या वेळेस तो तेथून जात होता. जमावाने जखमी झालेल्या लक्ष्मी हिला जबदस्तीने त्याच्या रिक्षात बसविले आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची विनंती केली होती. हॉस्पिटलचे कर्मचारी आणि पोलीस विनाकारण चौकशी करुन त्रास देतील या भीतीने तो हॉस्पिटलमध्ये न जाता कामण-भिवंडी येथे गेला, तिथे रस्त्याच्या कडेला तिला टाकून तो पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे.