गोळीबारप्रकरणी सलमान-अरबाज खानची जबानी नोंदविली

सलमानच्या राहत्या घरी चार तासात जबानी नोंदविण्यात आली

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१२ जून २०२४
मुंबई, – एप्रिल महिन्यांत सिनेअभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील निवासस्थानी झालेल्या गोळीबारप्रकरणी सलमान खानसह त्याचा भाऊ अरबाज खान यांची गुन्हे शाखेकडून जबानी नोंदविण्यात आली. गुन्हे शाखेचे चारजणांचे एक पथक सलमानच्या राहत्या घरी गेले होते, या पथकाने चार तासांत दिडशेहून अधिक प्रश्‍न विचारुन ही जबानी नोंदवून घेतली होती. या खटल्यात सलमानसह अरबाज हे महत्त्वाचे साक्षीदार असून त्यांचा जबाब अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या जबानीत सलमानला यापूर्वी आलेले धमकीचे पत्र, मेल आणि कॉल करणार्‍या व्यक्तीचा उल्लेख आहे.

१४ एप्रिल २०२४ रोजी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोरच लॉरेन्स आणि अनमोल बिष्णोईच्या इशार्‍यावरुन दोन अज्ञात बाईकस्वारांनी गोळीबार केला होता. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच त्याचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने तपासाला सुरुवात करुन सुरत, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब येथून सहा आरोपींना अटक केली होती. या आरोपींमध्ये हरपाल सिंग, मोहम्मद रफिक चौधरी, विकीकुमार साहेबसाह गुप्ता, सागरकुमार जोगीउडर राऊत पाल, अनुजकुमार ओमप्रकाश थापन आणि सोनूकुमार सुभाषचंद्र बिष्णोई याचा समावेश होता. त्यापैकी अनुजकुमार थापन याने पोलीस कोठडीत असताना गळफास घेऊन आत्महत्या केली होती. उर्वरित पाचही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या पाचही आरोपींचा गोळीबारात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे उघडकीस आले असून त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले आहेत. त्यात गुन्ह्यांत वापरलेल्या बाईकसह पिस्तूल, काडतुसे, मॅगझीनसह इतर वस्तूचा समावेश आहे. या गुन्ह्यांत सलमान खान हा मुख्य साक्षीदार आहे. त्यामुळे त्याची जबानी नोंदविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील होते, मात्र सलमान सतत शूटींगमध्ये व्यस्त असल्याने त्याची जबानी नोंदविण्यात आली नव्हती. अखेर सलमानने गुन्हे शाखेला त्याच्या घरी जबानी नोंदविण्याची विनंती केली होती.

४ जूनला गुन्हे शाखेचे चार अधिकारी सलमानच्या घरी गेले होते. जवळपास चार तास सलमानसह त्याचा भाऊ अरबाजची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात आली. सायंकाळी साडेपाच वाजता संबंधित पोलीस त्याच्या घरातून बाहेर पडले. सलमानची जबानी नऊ तर अरबाजची जबानी चार पानांची आहे. त्यांना सुमारे दिडशेहून अधिक प्रश्‍न विचारण्यात आले होते. बिष्णोई बंधूंकडून सलमानला अनेकदा जिवे मारण्याची धमकी आली होती. यावेळेस शूटर जिवे मारण्याच्या उद्देशानेच आले होते. मात्र पोलिसांमुळेच जीव वाचल्याची कबुली देताना सलमान खानने मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतुक केले. गोळीबाराच्या आदल्या रात्री त्याच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सलमान हा घरी होता तर अरबाज हा पार्टीनंतर त्याच्या घरी येथील घरी निघून गेला होता. पहाटे झालेल्या गोळीबारानंतर सलमानला जाग आली होती. गोळीबारानंतर काही वेळात वांद्रे पोलिसांची एक टिम तिथे आली होती. सलमान, अरबाजसह आतापर्यंत पोलिसांनी २९ जणांची जबानी नोंदवून घेतली आहे. यावेळी प्रसिद्ध लेखक आणि सलमानचे वडिल सलीम खान हे घरीच होते. मात्र त्यांची जबानी नोंदविण्यात आली नाही. या संपूर्ण कटात लॉरेन्स बिष्णोईचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यामुळे त्याचा लवकरच गुन्हे शाखेकडून ताबा घेतला जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page