खरेदी केलेले घर हेव्ही डिपॉझिटवर देऊन घरमालकाची फसवणुक
घराचा ताबा न देता शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – सुमारे २१ लाखांमध्ये घर खरेदी-विक्रीचा व्यवहार करुन खरेदी केलेले घर दुसर्या व्यक्तीला पाच लाख रुपयांच्या हेव्ही डिपॉझिटवर देऊन एका पिता-पूत्राने घरमालकाची फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पप्पू हिरालाल गुप्ता आणि सुमीत पप्पू गुप्ता या पिता-पूत्राविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. लवकरच या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
४७ वर्षांचे रमेश किट्टू पुजारी हे अंधेरीतील सहार रोड परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचे मुंबई शहरात कायमस्वरुपी घर नव्हते. मुलांच्या उज्जवल भविष्याच्या दृष्टीने ते अंधेरी पूर्वेला एक स्वतचे घर घेण्याचा विचार करत होते. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. त्यांनी त्यांचा परिचित एजंट शिवा जाधवला घराबाबत सांगितले होते. यावेळी त्याने त्यांना अंधेरीतील रामनाथ यादव चाळीतील पंचशील रहिवाशी संघातील एक घर दाखविले होते. ते घर पप्पू गुप्ता आणि त्यांचा मुलगा सुमीत गुप्ता यांच्या मालकीचे होते. त्यांना घराची विक्री करायची असल्याने त्यांच्यात एक मिटींग झाली होती. त्यात घर विक्रीचा सौदा २१ लाखांमध्ये पक्का झाला होता. रमेश पुजारी यांनी होकारानंतर त्यांच्यात घराच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु झाला होता.
याच दरम्यान त्यांनी यादव पिता-पूत्राला १९ लाख रुपयांचे पेमेंट केले होते. त्यानंतर त्यांच्या घराच्या खरेदी-विक्रीचा एक करार झाला होता. त्यानंतर त्यांनी सेल ऍग्रीमेंट, पॉवर ऍटर्नी आणि ऍफिडिव्हीटचे पेपर अंधेरीतील स्थानिक न्यायालयात बनविले होते. घराचे कागदपत्रे हाती येताच रमेश पुजारीने उर्वरित दोन लाख रुपयांचे पेमेंट दिले होते. मात्र संपूर्ण पेमेंट करुनही त्यांनी रुमचा ताबा दिला नव्हता. थोडा वेळ मागून ते दोघेही त्यांना ताबा देण्यास टाळण्याचा प्रयत्न करत होते. एक आठवड्यानंतर ते घराचा ताबा घेण्यासाठी तिथे गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घरामध्ये भाडेकरु राहत असल्याचे दिसून आले.
चौकशीदरम्यान त्यांना यादव पिता-पूत्राने त्यांची खरेदी केलेले घर गिरीश रावत या व्यक्तीला पाच लाख रुपयांच्या हेव्ही डिपॉझिटवर भाड्याने दिले होते. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी पप्पू गुप्ताकडे विचारणा केली होती. त्याने काही दिवसांत गिरीश रावतचे पाच लाख रुपये परत करुन त्यांना रुमचा ताबा देण्याचे आश्वासन दिले. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांना रुमचा ताबा मिळाला नाही. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी गुप्ता पिता-पूत्राने त्यांना शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. रुमचा ताबा देणार नाही आणि रुमसाठी घेतलेले पैसेही परत करणार नाही. पुन्हा या परिसरात आले तर त्याचे वाईट परिणाम होतील अशी धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी वारंवार गुप्ता पिता-पूत्रांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना घडलेला प्रकार सांगितला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी त्यांच्या तक्रारीची गंभीर घेत त्यांच्या सहकार्यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर रमेश पुजारी यांच्या तक्रार अर्जानंतर पप्पू गुप्ता आणि सुमीत गुप्ता या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या पिता-पूत्रांची पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.