ताज ग्रुपच्या माजी मॅनेजिंग डायरेक्टरकडून साडेदहा कोटीची खंडणी वसुली

ईडीचा तोतया अधिकारी हिरेन भगतला दुसर्‍या खंडणीच्या गुन्ह्यांत अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१६ फेब्रुवारी २०२४
मुंबई, – दक्षिण मुंबईतील नामांकित ताज ग्रुपचे माजी वयोवृद्ध मॅनेजिंग डायरेक्टरकडून साडेदहा कोटीची खंडणी वसुली करुन पिस्तूलच्या धाकावर त्यांच्यासह त्यांच्या मुलाला दगाफटका करण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुख्य आरोपी हिरेन रमेश भगत ऊर्फ रोमो याला गुरुवारी गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकार्‍यांनी अटक केली. हिरेनने तो स्वत ईडीचा वरिष्ठ अधिकारी असल्याची बतावणी करुन केंद्र आणि राज्य पोलीस यंत्रणेकडून सुरु असलेल्या कारवाईत मदत करण्याचे आश्‍वासन देऊन ही खंडणी वसुली केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत त्याला शुक्रवारी दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी हिरेनला अशाच एका खंडणी वसुलीच्या गुन्ह्यांत गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती.

९२ वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार वांद्रे येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. ते ताज ग्रुपमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहत होते. १९९७ साली या पदाववरुन ते निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांनी अशाच प्रकारे विविध ठिकाणी मानाचे पद भूषविले होते. त्यांच्या मुलाच्या कंपनीवर केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्यस्तरीय तपास यंत्रणांनी कारवाई केली होती. या कारवाईनंतर त्यांच्या कुटुंबियांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. चौकशीनंतर त्यांच्या मुलावर अटकेची कारवाई झाली होती. या घटनेनंतर त्यांनी एका मित्राकडे विचारणा केली होती. यावेळी या मित्राने त्यांची ओळख हिरेन भगतशी करुन दिली होती. हिरेनने तो ईडीचा वरिष्ठ अधिकारी असून त्याचे अनेक राजकीय नेत्यासह विविध वरिष्ठ अधिकार्‍यांशी ओळख असल्याचे सांगितले होते. त्यांच्या मुलाच्या प्रकरणात तो त्यांना सहकार्य करुन त्याला त्यातून सहीसलामत बाहेर काढेल असे आश्‍वासन दिले होते. त्याच्या बोलण्यातून तो खरोखरच ईडीचा बडा अधिकारी असल्याचे त्यांना वाटले होते. याच प्रकरणात मदत करण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला ९ कोटी ७५ लाख रुपये कॅश स्वरुपात तर दिले होते.

मात्र ही रक्कम घेऊन तो त्यांना मदत करत नव्हता. त्याच्याकडून आश्‍वासन पाळण्यात आले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी हिरेनने त्याच्याकडील पिस्तूलचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच कारागृहात असलेल्या त्यांच्या मुलाला दगाफटका करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तक्रारदार प्रचंड घाबरले होते. जिवाच्या भीतीसह मुलाला दगाफटका होऊ नये म्हणून त्यांनी हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. तो त्यांच्याकडे सतत खंडणीची मागणी करत होता. त्यामुळे त्यांनी त्याला काही पैसे आणि ७५ लाख रुपयांचा एक महागडा घड्याळ दिले होते. त्याच्या मागण्या वाढत असल्याने तसेच त्यांचा मुलगा कारागृहातून बाहेर न आल्याने त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला.

या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वांद्रे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनतर पोलिसांनी तक्रारदाराची जबानी नोंदवून हिरेन भगतविरुद्ध ईडी अधिकारी असल्याची बतावणी करुन खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. या गुन्ह्यांचा तपास येताच गुरुवारी हिरेनला पोलिसांनी अटक केली. यापूर्वी हिरेनला अशाच एका खंडणीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांत तो सध्या न्यायालयीन कोठडीत होता. त्याचा ताबा घेतल्यानंतर त्याला खंडणीच्या दुसर्‍या गुन्ह्यांत अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला किल्ला न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आतापर्यंतच्या तपासात हिरेन केंद्रीय संस्थेचा अधिकारी असल्याचे भासवून अनेक नामांकित व्यावसायिकांची फसवणुक करुन त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुली केली आहे. ईडी कार्यालयाचे नाव घेण्यामागे त्याचा नेमका काय हेतू होता. पैशांची मागणी केल्यानंतर तो पिस्तूलचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत होता. त्याला ते पिस्तूल कोणी दिले. तक्रारदाराकडून जानेवारी २०२० पासून हिरेन पावणेदहा कोटी रुपये कॅश स्वरुपात तर ७५ लाख रुपयांचा एक महागडा घड्याळ घेतले आहे. या रक्कमेची त्याने कशा प्रकारे विल्हेवाट लावली. त्याच्याकडून ते घड्याळ जप्त करायचे आहे. यापूर्वी त्याच्यासह त्याच्या पाच सहकार्‍यांना खंडणीच्या गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांत त्यांचा काही सहभाग आहे का याचा आता पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page