मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ जून २०२४
मुंबई, – गॅलरीत खेळणार्या एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला मोबाईलवर अश्लील व्हिडीओ दाखवून तिच्याशी लैगिंक चाळे करुन तिचा विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच २६ वर्षांच्या राजकुमार नावाच्या भाडेकरु तरुणाला कुरार पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
३२ वर्षांची तक्रारदार महिला ही मालाडच्या कुरारगाव परिसरात राहत असून तिला दहा वर्षांची मुलगी आहे. रविवारी ९ जूनला ती तिच्या घरातील गॅलरीत फुग्यासोबत खेळत होती. यावेळी त्यांच्या घरातील पोटमाळ्यावर राहणारा भाडेकरु राजकुमार (२६) हा तिथे आला. त्याने त्याच्या मोबाईलवरुन तिला अश्लील व्हिडीओ दाखविले आणि तिच्याशी अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने ती प्रचंड घाबरली आणि पळू लागली. यावेळी त्याने तिला पकडून हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली होती. शुक्रवारी हा प्रकार तिच्याकडून तिच्या आईला समजला. तिच्याकडून ही माहिती समजताच तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर तिने कुरार पोलिसांत आरोपी भाडेकरु राजकुमार याच्याविरुद्ध तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध ३५४, ३५४ अ, ५०६ भादवी सहकलम ८ १२ पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच काही तासांत आरोपीस पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला दिडोंशीतील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल जप्त केला असून या मोबाईलमध्ये काही अश्लील व्हिडीओ असल्याचे उघडकीस आले आहे. जप्त केलेला मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आला आहे.