रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणुक अधिकार्‍यावर गुन्हा

मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाणे चांगलेच महागात पडले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१५ जून २०२४
मुंबई, – गोरेगाव येथील नेस्को मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान मोबाईल नेण्यास मनाई असताना मोबाईल घेऊन जाणार्‍या शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकासह निवडणुक अधिकारी अशा दोघांविरुद्ध वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांमध्ये एम पंडिरकर आणि दिनेश गुरव यांचा समावेश आहे. यातील पंडिरकर हे रविंद्र वायकर यांचे नातेवाईक तर दिनेश निवडणुक अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या दोघांनाही चौकशीसाठी समन्स बजाविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

अलीकडेच लोकसभेची निवडणुक पार पडली. यावेळी उत्तर-पश्‍चिम लोकसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अमोल गजानन किर्तीकर आणि शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या थेट लढत झाली होती. शेवटपर्यंत चाललेल्या मतमोजणीदरम्यान या दोघांनी एकमेकांना चांगली लढत दिली होती. अखेर ४८ मतांनी रविंद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आले होते. गोरेगाव येथील नेस्को मतदान केंद्रावर मतमोजणीदरम्यान रविंद्र वायकर यांचे नातेवाईक एम. पंडिरकर हे मोबाईल घेऊन आले होते. मतदान केंद्रावर मोबाईन नेण्यास सक्त मनाई असताना त्यांना निवडणुक अधिकारी दिनेश गुरव यांनी मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. हा प्रकार नंतर उघडकीस येताच भारत जन आधार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रविंद्र वायकर यांच्यासह त्यांच्या नातेवाईक आणि निवडणुक अधिकार्‍यांविरुद्ध वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची पोलिसांनी शहानिशा सुरु केली होती. मतदान केंद्रातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतल्यांनतर हा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे या तक्रारीनंतर पोलिसांनी एम पंडिरकर आणि दिनेश गुरव यांच्याविरुद्ध १८८, ३४ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page